यूनिफाइड पेन्शन स्कीम ( UPS ) असं ठेवलं आहे. यातील यूनिफाइडचा यू हा मोदी सरकारचा यूटर्न आहे.
नवी दिल्ली, दि. २५ : मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून नवीन पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचे नाव यूनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) असणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मोदी सरकारने नव्या पेन्शन योजनेचं नाव यूनिफाइड पेन्शन स्कीम ( UPS ) असं ठेवलं आहे. यातील यूनिफाइडचा यू हा मोदी सरकारचा यूटर्न आहे. ४ जूननंतर जनतेची शक्ती पंतप्रधान मोदींच्या अहंकारावर हावी होत आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.४ जूननंतर मोदी सरकारने आतापर्यंत चार निर्णय मागे घेतले आहेत. सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेला दीर्घकालीन भांडवली नफा /इंडेक्सेशनच्या संदर्भातील निर्णय मागे घेतला आहे. तसेच वक्फ विधेयक जेपीसीकडे पाठवले आहे याशिवाय ब्रॉडकास्ट विधेयक आणि लॅटरल एंट्री योजनेतही सरकारने माघार घेतली आहे, असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसेच आम्ही सरकारचे उत्तरदायित्व सुनिश्चित करत राहू आणि या देशातील १४० कोटी भारतीयांचे संरक्षण करत राहू, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.