आपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागेल.
मोहन भागवत यांचे स्पष्ट मत; भेदभाव विसरून लढा द्यावा लागेल.नागपूर, दि. १५ मे : देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून हे संकट उभे राहिले. आता तिसर्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे; पण तिला न घाबरता तिला परत फिरावे लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी, असा सल्ला त्यांनी दिला.ऑनलाईन व्याख्यान श्रुंखलेमध्ये भागवत बोलत होते. ते म्हणाले, की आपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागेल. जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसेच करायचे आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावे लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितले त्यानुसार वेगाने काम करावे लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.या भागवत यांनी सर्वांनाच वैज्ञानिकतेचा आधार घेण्याचे आवाहन केले. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून घेतली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. वैज्ञानिकतेचा आधार घेणे आवश्यक आहे. कुणी सांगते, म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे, म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे असे माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येते. त्याचे वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये आणि आपणही अशा बाबीचे पालन करता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात; पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.सर्वांच्याच धैर्याची परीक्षानियमांचे पालन करून आपण समाजसेवा केली, तर आपण पुढे जात राहू. इतक्या वर्षांत इतक्या भयानक संकटात आपला देश अढळ राहिला. या जागतिक संकटासमोर कठीण संघर्ष होईल; पण तो आपण जिंकू. आपण जिंकायलाच हवा. ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल. दोष दूर करून सद्गुणांना वाढवून, ही परिस्थिती आपल्याला शिकवेल. ही आपल्या धैर्याची परीक्षा आहे. यश-अपयशाचा खेळ चालतच राहणार. सतत लढत राहण्याची हिंमत महत्त्वाची आहे. प्रयत्न करत राहा. निराश होण्याचे कारण नाही, अशा शब्दांत भागवत यांनी लोकांना आवाहन केले आहे.