पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोलकाता, दि. ११ : कोलकात्यामध्ये आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.३१ वर्षीय डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी (दि. ९) सकाळी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळला होता. चौकशी अहवालानुसार, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा दिसत होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीच्या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी काम बंद केलं आहे. शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला आज सियालदह न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली होती जी न्यायालयाने मंजूर केली आहे. न्यायमूर्तींनी फिर्यादीची विनंती मान्य करत आरोपीला २३ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.