IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election Phase III : तिसऱ्या टप्प्यात आज ९३ जागांसाठी मतदान, १ हजार ३५२ उमेदवार रिंगणात

Tuesday, May 07
IMG

९३ पैकी ११ जागा महाराष्ट्रात आहेत तर सर्वाधिक जागा गुजरातमध्ये २५ इतक्या आहेत. कर्नाटकात ११ जागांवर मतदान होईल.

मुंबई, दि. ७ : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशातील १० राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये ९३ जागांसाठी मतदान होत आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून सकाळी सात वाजताच मतदानाला सुरुवात झाली.पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून उन्हाच्या तडाख्यामुळे तुलनेत कमी मतदान झाल्याचे मानले गेले. तसेच दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी, २६ एप्रिल रोजी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ८८ मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. या टप्प्यातही मतदान कमी झाले आहे. या टप्प्यात एकूण १ हजार ३५२ उमेदवार रिंगणात आहेत. ९३ पैकी ११ जागा महाराष्ट्रात आहेत तर सर्वाधिक जागा गुजरातमध्ये २५ इतक्या आहेत. कर्नाटकात ११ जागांवर मतदान होईल. गेल्या दोन टप्प्यात अपेक्षित मतदान न झाल्याने तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. मतदारांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील, असा निवडणूक अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी ६ वाजता संपत असली तरी तोपर्यंत मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांना त्यांचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी उशिरपर्यंत सुरू राहणार आहे.

Share: