छोटीशी सुरवात देखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू शकते, हा विश्वास रुजविण्यात बडनेरा (जि. अमरावती) येथील दारोकार भावंडे यशस्वी झाली आहेत.
आशिष दारोकार यांचे वडील मोहनराव यांचा विटभट्टीचा व्यवसाय होता. तर मोहनराव यांचे वडील सुर्यभान हे कुटूंबीयांची शेती सांभाळत होते. दरम्यान सुर्यभान यांच्या निधनानंतर शेतीची सूत्रे हाती आल्यावर मोहनराव यांनी सुरवातीला काही वर्ष पारंपारीक पिके घेतली. त्यानंतर आशिषकडे शेतीचे सुत्रे आल्यानंतर पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय त्याने घेतला. भाजीपाला पिकांचा आदर्श बाजाराची मागणी आणि हंगाम लक्षात घेऊन भाजीपाला पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार सध्या त्यांच्या शेतात एका एकरावर वांगी लागवड केली आहे. लग्नसराई तसेच धार्मिक उत्सवात वांग्याची भाजी करण्याला प्राधान्य राहते, त्यामुळे वांग्याचे मार्केट लक्षात घेत आता वांगी लागवडीवर भर देण्यात आल्याचे आशिष सांगतो. त्यासोबतच बरबटी शेंग, कोथींबीर यासारखी पीक घेतली जातात. ज्यावेळी भाजीपाला पिकाला मार्केट नसल्याचे लक्षात येते त्यावेळी पावसाळी मूग घेण्यावर त्यांचा भर राहतो. पोल्ट्रीमध्ये रोवले पाय 2005 साली शेतीला अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत असावा याकरीता पोल्ट्री व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. आशिष याने कृषी डिप्लोमा केला आहे. त्यातील माहिती आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे त्याला हा व्यवसाय करणे अवघड नव्हते. चुलतभाऊ पंकजचे सहकार्य त्याने या व्यवसायाकरीता घेतले. दोघांनी मिळून सुरवातीला 1500 पक्ष्यांच्या संगोपनावर भर दिला. पुणे येथील एका पुरवठादारांकडून पक्ष्यांची त्यावेळी खरेदी होत होती. बॉयलर आणि गावरान पक्ष्यांचे दोन दोन बॅच त्यावेळी काढल्या जात होत्या. 2014-15 पर्यंत अशाप्रकारच्या बॉयलर आणि गावरान पक्ष्यांची विक्री होत होती. मार्केटींगचा फंडा बडनेऱ्यातील स्थानिकांना व्यवसायाच्या सुरवातीला ते किरकोळ विक्री करत होते. त्यांच्या माध्यमातूनच पुढे या क्षेत्रातील व्यापारी व वितरकांची माहिती कळाली. त्यांच्याशी नंतर मोबाईलवरुन संपर्क साधण्यात आला. व्यापाऱ्यांकडून त्यावेळी मागणी वाढू लागली; त्यामुळे व्यवसाय वाढ करण्याचे या भावंडांनी ठरविले. टप्याटप्याने ही वाढ करण्यात आली आणि 2007 मध्ये गावराण कोंबड्यांकरीता अमरावती जिल्हयातील सर्वात मोठा फार्म म्हणून या भावंडांच्या व्यवसायाने परिसरात लौकीक मिळविला होता. हैदराबाद किंवा लातूर परिसरातून गावराण पक्ष्यांची त्यावेळी खरेदी केली जात होती, असे आशिष सांगतो. आता निवडला वेगळा पर्याय सुरवातीला स्वतः चिल्लर विक्री, त्यानंतर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्रीचा पर्याय आणि आता कंपनीच्या माध्यमातून एक दिवसाच्या पक्ष्यांचा पुरवठा आणि संगोपनानंतर विक्री असा करार पध्दतीचा पॅटर्न त्यांनी राबविला आहे. नागपूर येथील एका कंपनीशी हा करार केला आहे. दर चाळीस दिवसांनी सरासरी 2200 ग्रॅम वजन मिळाल्यानंतर कंपनीव्दारे पोल्ट्री फार्मवरुन पक्षी विक्रीसाठी नेले जातात, असा करार हा करार आहे. यासाठी साडेसात ते आठ रुपये प्रती किलो असा दर कंपनीकडून दिला जातो. कंपनी आणि शेतकरी करार या करार पध्दतीत कंपनीकडून एक दिवसाचे पक्षी, पशुखाद्य तसेच लसीकरणाकरीता लागणाऱ्या औषधींचा पुरवठा होतो. व्यवस्थापन केवळ शेतकऱ्याला करावे लागते. आज दारोकार भावंडांकडून सुमारे 15 हजार 500 पक्ष्यांचे संगोपन या करार पध्दतीतनुसार केला जाते. विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक राहते; परिणामी या कालावधीत पोल्ट्रीतील पक्ष्यांचे संगोपन जिकरीचे ठरते. त्यामुळे सध्या 15 हजार 500 एवढीच पक्ष्यांची संख्या असल्याचे आशिषने सांगितले. इतरवेळी सुमारे 19 हजार पक्ष्यांचे संगोपन त्यांच्या शिवारात होते. त्या क्षमतेचे शेड उभारण्यात आले आहे. असे आहेत शेड 19 हजार 500 चौरस फुट आकाराचे शेड दारोकार कुटूंबीयांच्या शिवारात आहेत. यातील आशिष दारोकार यांचे शेडचा आकार 100 बाय 30 फुटाचा असून ते 12 हजार चौरस फुटाचे आहे. शेडच्या उभारणीवर सुमारे 35 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे ते सांगतात. पंकज दारोकार यांच्याकडील साडेसात हजार चौरस फुटाचा शेड आहे. 20 लाख रुपयांचा खर्च या शेडच्या उभारणीवर झाला आहे. शेडच्या उभारणीसाठी चांगल्या प्रतीचे लोखंडी पाईप आणि जाळीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शेडच्या किंमती वाढल्याचे ते सांगतात. शेडच्या परिसरात थंडावा कायम राहावा याकरीता पोल्ट्री शेड असलेल्या परिसरात वृक्षारोपणावरही भर दिला गेला आहे. दोन शेडच्या मधात लिंबूची काही झाडेही लावली आहेत. लिंबूपासून भविष्यात पैसे मिळतील आणि परिसरात गारवाही राहील असा दुहेरी उद्देश त्यामागे आहे. पाण्यासाठी असे आहेत पर्याय पोल्ट्री फार्म तसेच शेती असलेल्या परिसरात दोन विहीरी आणि एका बोअरवेलचा पर्याय आहे. त्यासोबतच पोल्ट्री फार्मच्या व्यवस्थापनाकरीता दोन मजूर कुटूंबीयांची कायमस्वरुपी नियुक्त केली आहे. बारा हजार रुपये महिना या कुटुंबियांना दिल्या जातात. उन्हाळ्यात घ्यावी लागते विशेष काळजी विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक राहते. त्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यवसायिकांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानुसार शेडचे वातावरण राखले जावे याकरीता आशिष व पंकज दारोकार यांनी पोल्ट्री शेडच्या वरील बाजूस स्प्रिंकलर लावले आहेत. दुपारी 11 ते सायंकाळी पाच यावेळात ते सुरु ठेवले जातात. शेडच्या जाळी असलेल्या भागात ग्रीन नेट तसेच बारदाना लावला जातो. अशाप्रकारच्या उपचारातून तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न होतो. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यास बल्ब आणि हिटरच्या माध्यमातून पक्ष्यांना आवश्यक तेवढे तापमान शेडमध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळा आणि हिवाळ्यात पक्ष्यांची खास काळजी घ्यावी लागते, असे ते सांगतात. कामगाराच्या मुलीच्या शिक्षणाचा उचलला भार पोल्ट्री व्यवसायाचे दैनंदीन व्यवस्थापन करण्याकामी त्यांनी मजूर कुटूंबाची नियुक्ती केली आहे. मुळचे मध्यप्रदेशातील असलेल्या यातील एका मजूर कुटूंबीयाला तीन मुली आहेत. त्यातील एका मुलीच्या इंग्रजी शाळेतील शिक्षणाचा खर्च दारोकार करतात. अशाप्रकारच्या उदाहरणातून त्यांनी मजूर आणि मालकामधील संबंध वृध्दींगत करण्यासोबतच एक नवा सामाजिक संदेशही दिला आहे.