IMG-LOGO
लोकसभा २०२४

ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी

Wednesday, Jun 26
IMG

आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ओम बिर्ला यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली, दि. २६  : ओम बिर्ला हे १८ व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. आवाजी मतदानाने बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र येत ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत घेवून गेले. नव्या लोकसभेचा अध्यक्ष निवडताना शक्यतो निवडणूक टाळली जाते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या चर्चेमधून एकमताने निवड करण्यात येते. मात्र, यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले. पण त्यात यश आले नाही. विरोधी पक्षाने लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर दावा केला. मात्र सरकारने याबाबत कोणतेही आश्वासन विरोधी पक्षाला दिले नाही. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षानेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला. मात्र या निवडणुकीसाठी मतदान घेतले गेले नाही. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ओम बिर्ला यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.  

Share: