विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या त्यानंतर भाजप आपली रणनीती समोर आणेल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
नवी दिल्ली, दि. २ जुलै : देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकी सुरु असल्याचं दिसतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातही गुप्त बैठक झाल्याने पावसाळी अधिवेशनाआधी महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामुळे ठाकरे सरकार कोंडित सापडलंय अशात भाजपने सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या त्यानंतर भाजप आपली रणनीती समोर आणेल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अजून कुठेही अधिकृत रित्या घोषणा झालेली नाही. ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनिती सगळ्यांसमोर आणेल. पहिल्यांदा महाविकास आघाडीला तो निर्णय करून द्या. गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे, त्यामुळे एवढेच सांगतो की, जोपर्यंत त्यांच्या अध्यक्षपदाची निवड होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.