IMG-LOGO
राष्ट्रीय

वंचित बहुजन आघाडीची बिहारच्या निवडणुकीत उडी

Friday, Oct 02
IMG

वंचित बहुजन आघाडी बिहार विधानसभा निवडणूक जन अधिकार पार्टी(लो)चे अध्यक्ष आणि प्रोग्रेसिव डेमोक्रेटिक अलायन्स(PDA) चे निमंत्रक राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्यासोबत मिळून लढणार आहे.

पाटणा, दि. ०२ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिहारमधील राजकीय समीकरणांविषयी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राशी संबंधित दोन पक्षांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी बिहार विधानसभा निवडणूक जन अधिकार पार्टी(लो)चे अध्यक्ष आणि प्रोग्रेसिव डेमोक्रेटिक अलायन्स(PDA) चे निमंत्रक राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्यासोबत मिळून लढणार आहे. यशवंत सिन्हा आणि कॉंग्रेसला सोबत घेण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. मागच्या वेळेप्रमाणे यंदाही आम्ही एनडीए सरकारला हरवण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.आम्हाला देशात नवं राजकारण आणायचं आहे, त्याची सुरूवात आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एमआयएमसोबत युती करून केली होती. त्यात आम्हाला मोठं यश मिळालं होतं. आम्हाला अपेक्षा आहे की हे यश आम्ही पुढं घेऊन जाऊ. जे महाराष्ट्रात झालं नाही, ते बिहारमध्ये होऊ शकतं. बिहार निवडणूक लढवण्यामागचा एकमेव उद्देश हा एनडीएला पराभूत करणं हाच आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

Share: