सर्व बेकायदा कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तारिक थॉमस यांनी दिली.
नवी दिल्ली, दि. २९ : मुसळधार पावसामुळे राजेंद्र नगर परीसर जलमय झाला असून याठिकाणी असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरातही पाणी शिरले. त्यामुळे याठिकाणी असलेले लोक अडकले. अग्निशमन दलाला सायंकाळी ७ वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचे फोन बंद दाखवत असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टिप्पणी केली आहे. परवानगी नसतानाही या इमारतीच्या तळघरात लायब्ररी सुरु करण्यात आली होती. या ठिकाणी वर्गदेखील घेतले जात होते. महत्त्वाचे म्हणजे या तळघराची परवानगी गोडाऊन म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन करत यासाठिकाणी बेकायदा लायब्ररी सुरु करण्यात आली होती. यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी आता 13 कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर एमसीडीचे अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांनी घटनास्थळाची पाहणी करत या आयएएस कोचिंग सेंटरचे बेकायदा तळघर सील करण्यात आले आहे. याचबरोबर दिल्लीतील तळघरात चालणाऱ्या सर्व बेकायदा कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तारिक थॉमस यांनी दिली. तसेच तपास पथकाच्या माहितीनुसार, आतापर्यंत दिल्लीत तळघरांमध्ये सुरु असलेली बेकायदेशीर १३ कोचिंग सेंटर्सही सील करण्यात आले आहेत.