बालमित्रांसाठी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणारा बालक दिन यावर्षी पूर्ण आठवडाभर साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.
मुंबई, दि. 6 : बालमित्रांनो, आपल्या मनातील विचार चाचा नेहरुंना पत्र लिहून कळवा, नाही तर स्वतःच चाचा नेहरू बनून ‘मी नेहरू बोलतोय’ या विषयावर आपला व्हिडिओ बनवा. एखादी कविता सादर करा, नाहीतर नेहरूजींच्या जीवनातील कथा सादर करा आणि #baldivas२०२० हा हॅशटॅग वापरून अपलोड करा. प्रशस्तीपत्र आणि पारितोषिके जिंका, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.बालमित्रांसाठी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणारा बालक दिन यावर्षी पूर्ण आठवडाभर साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दि. 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्यावतीने साजरा करण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे. या उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ हे सोशल मीडिया जसे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यावर आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन #baldivas२०२० या हॅशटॅगचा वापर करुन अपलोड करावेत. www.maa.ac.in या वेबसाईटवर देखील अपलोड करु शकता. बालदिवस सप्ताहाच्या अनुषंगाने तालुकास्तर, जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर रोख स्वरुपातील बक्षिसे व प्रशस्तीपत्र आहेत. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्याची सुविधा देखील केलेली आहे. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी उपक्रमांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड यांनी आवाहनात म्हटले आहे.