IMG-LOGO
नाशिक शहर

अमृत’ च्या माध्यमातून खुला प्रवर्गातील उमेदवारांना प्रशिक्षण

Thursday, Sep 05
IMG

उमेदवारांना उद्योगाभिमुख रोजगार आणि स्वयंरोजगाराचे निवासी व अनिवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

20 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*नाशिक, दि. 4 :  महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत व इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यांना कोणत्याही विभाग, संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही, अशा उमेदवारांना उद्योगाभिमुख रोजगार आणि स्वयंरोजगाराचे निवासी व अनिवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी  www.mahaamrut.org.in या अमृत च्या संकेतस्थळावर 20 सप्टेंबर f2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन अमृत चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) या संस्थेत उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘अमृत’ संस्थेच्या लक्षीत गटातील उमेदवारांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, रहाणे व भोजन) या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. राज्यातील खुला प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील महाराष्टातील अधिवासी युवक व युवतीं या योजनेचा लाभ घेवू शकतात. इयत्ता 10 वी पास तसेच आय.टी.आय/ डिप्लोमा/ डिग्री उत्तीर्ण  अथवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत 15 निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम व 30 अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर या उपकेंद्रात दिले जाणार आहे.उद्योगाभिमुख रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वावलंबनाला चालना देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून योजनेच्या अधिक माहितीसाठी अमृतचे  www.mahaamrut.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Share: