मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
मुंबई, दि. ६ मे : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर चार आठवड्यांनी सुनावणी घेण्यात येणार आहे. तोपर्यंत देशमुख यांना कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. देशमुख यांनी काही पोलिस अधिकार्यांना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. सिंग यांच्या या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने त्यास मंजुरी दिल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला व देशमुख यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करण्याच्या या कारवाईला देशमुख यांनी आव्हान दिले आहे.न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे आज हे प्रकरण सुनावणीसाठी आले. सीबीआयने या वेळी आपली भूमिका मांडली. ‘आम्हाला कालच याचिकेची प्रत मिळाली आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी किमान चार आठवड्यांची मुदत द्यावी’, अशी विनंती सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी दिली. त्यामुळे खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यानंतर ठेवली. त्यावर, पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षणाचा दिलासा द्यावा, अशी विनंती देशमुख यांच्या वकिलांनी केली; मात्र खंडपीठाने त्यास नकार दिला. तातडीचे कारण उद्भवल्यास याचिकाकर्ते उन्हाळी सुट्टीकालीन कोर्टासमोर तातडीचा अर्ज करू शकतील, अशी मुभा खंडपीठाने दिली आहे.