IMG-LOGO
नाशिक शहर

शिक्षण क्षेत्रातील बदलांचा 'एआय'मुळे वाढणार वेग : कुलकर्णी

Saturday, May 25
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. माणेकलालजी भटेवरा स्मृती व्याख्यानात ते 'Education 4.0 : नवे शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षण पद्धतीचा संगम' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. २५ :  जसजसा समाज आणि औद्योगिक क्षेत्र  बदलत जाते, त्याप्रमाणे शिक्षणही बदलले पाहिजे. मात्र हे बदल यांत्रिकीकरणातून होत असल्याने ते घातक आहे. त्यामुळे हे बदल स्वीकारताना आजही आपल्याला गुरुकुल पद्धतीची आठवण येते. येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हा वेग आणखी वाढणार आहे. त्यासाठी आपण आतापासूनच सज्ज असलो पाहिजे. असे प्रतिपादन फिनलंड येथील प्रगतिशील शिक्षण तज्ज्ञ व तंत्रज्ञान तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. माणेकलालजी भटेवरा स्मृती व्याख्यानात ते 'Education 4.0 : नवे शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षण पद्धतीचा संगम' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. माणेकलालजी भटेवरा यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. कुलकर्णी  म्हणाले की, शिक्षण ही संकल्पना समजण्यासाठी आधी समाज रचना समजून घेतली पाहिजे. सुरवातीला मनुष्य हा शिकारी रूपात होता. कालांतराने कृषी, औद्योगिक, संगणक, इंटरनेट अशी सुधारणा होत गेली. येत्या काळात क्रिएटिव्ह सोसायटी हे समाजाचे नवे रुप असेल. कारण आजमितीस तंत्रज्ञानावर जगभर प्रचंड काम सुरू आहे. आपल्या मोबाईलवर आता पुर्वीप्रमाणे बटणं दिसत नाहीत. अशा बदलांना त्या त्या क्षेत्रात 1.0, 2.0 असे नामकरण केले जाते. एज्युकेशन 4.0 हा त्यातलाच प्रकार आहे. समाजात असे बदल व्हायला हजारो वर्ष लागले. मात्र आज या बदलांना प्रचंड वेग आला आहे. तंत्रज्ञानाची उपयुक्तता कळताच या सुधारणा वेग घेतात. यूपीआय पेमेंटच्या बाबतीत आपण युरोपपेक्षा 25 वर्षे पुढे आहोत. परंतु शिक्षणाच्या बाबतीत हा वेग अत्यंत कमी आहे, याची खंत वाटते. पूर्वीच्या गूरूकूल पद्धतीला आपणच आपल्या कर्माने बंद पाडली आहे. ही पद्धती उपयुक्त होती असे आज आपण म्हणतो; पण ती स्वीकारायला कुणीही धजावत नाही. असे सांगुन त्यांनी शिक्षण पद्धतीतील सुधारणांचे विविध टप्पे उलगडून दाखवले. 1.0 हे व्हर्जन अधिक काळ अस्तित्वात होते. इंटरनेट आल्यानंतर हा वेग प्रचंड वाढला. पण आपण गुणवत्ता गमावली आहे. ही अवस्था शिक्षण- 2.0 च्या काळात होती. त्यानंतर सध्या आपली शिक्षण व्यवस्था 3.0 च्या स्थितीत आहे. यामध्ये होत  असलेले बदल, होत असलेल्या सुधारणा यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. त्यानंतर त्यांनी येत्या काळात येऊ घातलेली अवस्था अत्यंत घातक आहे. त्यामुळे या दृष्टीने आतापासूनच विचार होणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्राचा फक्त व्याप वाढत आहे. अमेरिकेत ज्या पद्धतीने बदल स्वीकारले जातात, तो खऱ्या अर्थाने पुढील पाऊल आहे, असे सांगत त्यांनी सोशल लर्निंग रोबोट आणि तत्सम अनेक उपकरणांची माहिती दिली. हे धोके ऐकायला कटू वाटत असले तरी ती वस्तुस्थिती आहे. सगळीच कामं यंत्र करत असतील तर शिक्षकांचे कामच काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो. त्याचेही उत्तर काय असेल याचाही विचार केला पाहिजे. विद्यार्थी शिक्षणात रस घेतील यासाठी काहीही करणे, विशिष्ट विषय आणि संकल्पना उपलब्ध करून देणे, कौशल्य विकास कसा करायचा यावर मंथन करणे, प्रत्येक क्षेत्रात होणारे बदल आणि त्याचे परिणाम शोधणे हेच शिक्षकांचे यापुढे काम असेल. हे बदल शिक्षक आणि संस्थांनाही कळले पाहिजे. तंत्रज्ञान वापरणे सोपे होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला एआय वापरता येणार असल्याचे सांगुन, सध्या याच दिशेने काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आर. डी. कराओके व राज ढगे प्रस्तुत 'आर. डी. हिटस' हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये संजय जोशी, राज ढगे, निलेश रणधीर, हेमंत चव्हाण, मिलन तांबे, वृषाली गोळेसर, दिपाली देव, समीक्षा आहीरे, पल्लवी तांबे यांनी सदाबहार हिंदी गिते सादर केली. उस्मान पटणी यांनी निवेदन केले.

Share: