मराठी मतं मिळवण्यासाठी मराठी भाषिक नेत्यांचा विचार काँग्रेस करत असल्याचंही बोललं जातं होत त्यानंतर जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबई, दि. १९ डिसेंबर : मुंबई काँग्रेसमध्ये सध्या अध्यक्षपदासाठी चुरशीची लढाई होताना दिसत होती. येत्या काळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत काही अंदाज व्यक्त केले जात होते. त्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला असून आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मुंबईसह कोकणात दारूण पराभव झाला. मुंबईतील पक्षाची कामगिरी बरी न झाल्यामुळे माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वावर पक्षांतर्गंत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. म्हणूनच पुन्हा एकदा मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी इच्छुक होते. तसेच मराठी मतं मिळवण्यासाठी मराठी भाषिक नेत्यांचा विचार काँग्रेस करत असल्याचंही बोललं जातं होत त्यानंतर जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.