केंद्रीय परीक्षा नियंत्रक मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारलादेखील त्यासंदर्भात विचारणा केली जाऊ लागली होती.
मंत्रिमंडळाचा निर्णय; मार्गदर्शक सूचना जाहीरमुंबई, दि. २० एप्रिल : कोरोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. केंद्रीय परीक्षा नियंत्रक मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारलादेखील त्यासंदर्भात विचारणा केली जाऊ लागली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेवरून पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता; मात्र अन्य बहुतांश मंडळांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र सरकारनेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाईल. यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चा करून, महाराष्ट्र मंडळासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील इतर बोर्डांकडूनदेखील अशा प्रकारचे निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आले आहेत. याआधी सीबीएससी, आयएससी या दोन बोर्डांनीदेखील त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मंडळाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांचे काय, असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. त्यानंतर अखेर राज्य सरकारनेदेखील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षा मात्र होणार आहेत.