IMG-LOGO
मंथन

महाराष्ट्र सोशल फोरम यांच्या ऑनलाईन चर्चासत्राचा समारोप

Sunday, Aug 23
IMG

गांधी विचारात सत्याग्रह आणि तुरुंग यांना महत्त्व होते ,असे आपल्या लक्षात येते. आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही.

महाराष्ट्र सोशल फोरम यांच्या ऑनलाईन चर्चासत्राचा समारोप झाला. यावेळी डॉ बाबा आढाव यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आमदार कपिल पाटील यांनी बाबांच्या कार्याचा ओघवता आणि सुंदर परिचय करून दिला.डॉ बाबा आढाव म्हणाले, " शिक्षण आणि आरक्षणातून मध्यमवर्ग तयार झाला.  समाजवादी विचारात तुरुंग हावडे आणि मतपेटी याला महत्त्व होते . मतपेटीचे काय झाले ते आपण बघतो आहोत पण फावडेही आपल्यापासून दूर गेले. आपल्यासाठी तुरुंग हा महत्त्वाचा ठरू शकतो . या चर्चेत गांधी विचारांची भलावण सर्वांनीच केली . पत्रकार रविश कुमार यांनीसुद्धा महात्मा गांधींचे संदर्भ दिले . गांधी विचारात सत्याग्रह आणि तुरुंग यांना महत्त्व होते ,असे आपल्या लक्षात येते.  आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही . हा संघर्ष रचनात्मक संघर्ष असेल . त्यासाठी सत्याग्रहाची तयारी करावी लागणार आहे . घटनेतील मूल्य रुजविण्याची आज गरज आहे . भारतीय राज्य घटनेची मोडतोड होता कामा नये . असंघटित क्षेत्रातील कामगार स्त्रिया म्हणतात ,  माणसाला नुसतं पोट नसतं ,इज्जत असती . त्या बाईला इज्जत हे मूल्य महत्त्वाचं वाटतं.  सोशल फोरमच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. आपल्याला सतत संपर्क ठेवावा लागेल . या संपर्कातून संवाद घडून येईल. मला पुढील काळात क्रांती चक्र फिरतं राहण्यासाठी सत्याग्रह महत्त्वाचा वाटतो.  तुम्ही पुढील काळात जेव्हा सत्याग्रह कराल त्यावेळी मी तुमच्यासोबत असेल. "डॉ बाबा आढाव यांनी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे महत्त्व सांगितले . ' क्रांती जिंदाबाद रहेगी क्रांती जिंदाबाद ' या गाण्याची आठवण सुद्धा त्यांनी काढली .डॉ बाबा आढाव यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ सतत गतिमान ठेवली.  विषमता निर्मूलन शिबिरातून कार्यकर्ते घडविले .त्यामुळे आजचे त्यांचे भाषण सर्वांनाच वेधक आणि प्रेरणादायी वाटले. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ गणेश देवी यांनी या चर्चेचा समारोप केला .राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकारातून ही ऑनलाइन चर्चा , वेबिनार पार पडली.  त्यातून परिवर्तनाची , प्रबोधनाची चळवळ नव्याने उभी राहील असे आश्वासक वातावरण आजच्या परीचर्चेतून निर्माण झाले.प्रा डॉ शंकर बो-हाडे९२२६५७३७९१shankarborhade@gmail.com

Share: