IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik Oxygen Tank Leak : महापालिकेच्या रुग्णालयात मृत्यूचे तांडव, मृतांची संख्या २४, दिवसभरातील घटनाक्रम एका क्लिकवर

Wednesday, Apr 21
IMG

खा. भारती पवार, आ.राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ सरोज अहिरे, महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक तसेच वैद्यकीय अधिकारी यांनीही भेट देत परिस्थितीची माहिती जाणून घेत संबंधितांना सूचना दिल्या.

नाशिक दि. २१ एप्रिल :  ऑक्सिजनचा तुटवडा देशभरात जाणवत असताना दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये अतिशय खळबळजनक दुर्देवी घटना घडली आहे. नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास टँकरच्या माध्यमातून ऑक्सिजन भरत असताना पाइपाचा वॉलला प्रचंड गळती सुरू झाली. ऑक्सीजनची गळती थांबवण्यासाठी नाईलाजाने रुग्णालयातील रुग्णांसाठी असणाऱ्या पाइपलाइनच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या गॅसचा पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे निष्पाप २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता, मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी यावेळी एकच टाहो फोडल्याने वातावरण सुन्न झाले होते. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. याप्रकरणी दोषी असणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे संकेत देत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांनीही दुःख व्यक्त केले आहे. घटनास्थळी तातडीने महसूल आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, महापौर यांनी धाव घेत मदत कार्यासंदर्भात सूचना केल्यात. तर पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिषदेचे विधान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.खा. भारती पवार, आ.राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ सरोज अहिरे, महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक तसेच वैद्यकीय अधिकारी यांनीही भेट देत परिस्थितीची माहिती जाणून घेत संबंधितांना सूचना दिल्या. घटनेमुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नाशिक महापालिकेच्या द्वारका नजीक असणाऱ्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकरच्या माध्यमातून ऑक्सिजन भरला जात होता. मात्र याच वेळी ऑक्सीजन पाइपलाइनच्या एका व्हॉल्वमधे दोष निर्माण होऊन अचानक प्रचंड वेगाने गळती सुरू झाली. ही गळती थांबवण्यासाठी प्रचंड पराकाष्टा करण्यात आली. तरीही ही गळती थांबत नसल्याने रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या पाईपलाईन मधून ऑक्सिजनचा पुरवठा कमी जाऊ लागला. या कमी प्रेशरमुळे रुग्णांना ऑक्‍सिजन कमी मिळाले असल्याने रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाला. यावेळी तेथे उपस्थित असणारे रुग्णांचे आप्त भांबावून गेले, एकच रडारड झाली, रुग्ण तडफडत असताना डॉक्टर, नर्सला बोलून रुग्णाला वाचवा असा टाहो फोडण्यात आला. मात्र परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची होत आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कोणालाही काही कळत नव्हते, अखेर अग्निशामक दलाच्या मदतीने गळती थांबविण्यास तब्बल दोन तास लागले. दरम्यानच्या काळात अत्यवस्थ बनलेल्या रुग्णांना शहरातील अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, या दुर्देवी घटनेमध्ये अकरा पुरुष आणि अकरा महिला रुग्णांचा मृत्यू झाला. यावेळी एकच गलका झाला रुग्णांच्या आप्तांनी काळीज चिरून टाकणारा टाहो फोडला. महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना घडतात महापौर, उपमहापौर, मंत्रीगण यांनी धाव घेत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपले आप्तस्वकीय रुग्ण हे दगावले आहेत याची माहिती मिळताच शहरातून मोठ्या संख्येने रुग्णांचे नातेवाईक महापालिकेच्या डॉ. जाकिर हुसेन रुग्णालयात आले होते. दरम्यान या घटनेत ऑक्सिजन अभावी तडफडणाऱ्या तीस ते पस्तीस रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. यापैकी काहींची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पालिका आयुक्त कैलास जाधव भेटीदरम्यान घटनेची चौकशी केली जाईल, हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे सांगितले. तर शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची माहिती घेतली. या घटनेत निम्म्या रुग्णांचा मृत्यू झाला असावा जर टेक्निकल टीम ठेवली असती तर दुर्घटना झाली नसती, त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली. हॉस्पिटलमध्ये साधारणपणे दीडशे रुग्ण होते, ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा हळू संपत चालला होता त्यामुळे वेळीच काही जणांनी खबरदारी घेत आपले रुग्ण अन्यत्र हलविले होते.तीन सदस्यांची समिती करणार चौकशी : पालकमंत्री भुजबळपालकमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी आयएएस अधिकारी, इंजिनियर आणि एक डॉक्टर अशा तिघांची एक कमिटी नेमून चौकशी केली जाईल असे सांगितले. दरम्यान या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले. राज्य शासनाकडून पाच लाख आणि नाशिक महापालिकेकडून पाच लाख असे एकूण दहा लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना केली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.घटनेची चौकशी होणार : महापौर सतीश कुलकर्णी घटना ही अतिशय दुर्देवी असून या घटनेची चौकशी केली जाईल. तसेच जे रुग्ण अत्यवस्थ आहेत त्या रुग्णांची विशेष काळजी घेऊन त्यांना सर्वतोपरी वैद्यकीय उपचार केले जातील. अशी प्रतिक्रिया महापौर सतीश कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दिली.मनपाचा खुलासाडॉ. झाकिर हुसेन हे १५० बेडचे कोविड रुग्णालय असुन येथे काल सकाळी १० वाजता १५७ रुग्ण दाखल होते, पैकी १३१ रुग्ण  ऑक्सिजनवर, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर व ६१ रुग्ण क्रिटिकल होते. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासाठी १३ हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन टॅंक तैयो निप्पोन या कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेला आहे. उपरोक्त कंपनीकडून सदरचा टॅंक हा १० वर्षाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आलेला असुन त्याची देखभाल दुरुस्ती व यामध्ये भरावयाचा लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही उपरोक्त कंपनीकडे आहे. सदरचा टॅंक  दि. ३१/०३/२०२१ रोजी कार्यान्वित केलेला आहे.काल दुपारी सुमारे १२.३० वाजता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे टॅंकची पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजुला गळती आढळून आली. त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसुन आले. ही बाब रुग्णालयातील डॉक्टर यांनी तात्काळ  निदर्शनास आणून दिली. गळती दुरुस्तीसाठी शहरातील निखील गॅसचे मालक श्री. शेटे व पिनॅकल कंपनीचे इंजिनीयर यांना तातडीने घटनास्थळी बोलाविण्यात आले. फायर टेंडर मधून पाणी फवारणी करून ऑक्सिजन  गळतीची जागा तज्ञांनी शोधली. सदर गळतीची पहाणी करुन गळती होणारा पाईपचा भाग दुरुस्त करुन पुन्हा जोडणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी सुमारे ०१.४५ ते ०२.०० वाजता सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात  या कंपनीचा लिक्वीड ऑक्सिजनचा टँकर दैनंदीन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यासाठी स्थळावर आलेला होता व त्यामधून लिक्वीड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आले.      मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अजय बोरस्ते, मनपा विरोधी पक्षनेतेडॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे २४ निष्पाप नाशिकरांचा झालेला मृत्यू हा अत्यन्त वेदनादायी आणि तितकाच संताप जनक आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी बसवण्यात आलेली ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा खराब होतेच कशी? खरा प्रश्न आहे. मुळात शहरातील ज्या महत्वाच्या आपत्कालीन व्यवस्था आहेत पाणी व्यवस्थापन, अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्थापन या यंत्रणांच्या बाबतीतरी दर्जा हा जपला गेला पाहिजे, परंतु दुर्दैवाने या पंचवार्षिक मध्ये सत्ताधारी व ठेकेदार यांचा एक वेगळाच ऋणानुबंध बघायला मिळतो आहे. ज्यातून अश्या निकृष्ठ दर्जाच्या यंत्रणा ह्या महापालिकेत वाजत गाजत आणल्या जात आहेत. या घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदार असो अथवा या ठेकेदारास पाठीशी घालणारा कोणी अधिकारी असो या सर्वांची चौकशी करून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडवणीस यांना आठवण करून द्यावीशी वाटते, उटसूट ठाकरे सरकारवर तोंडसुख घेण्याऐवजी या नाशिकला आपण दत्तक घेतले होते याची आपणास आठवण राहिलेली नाही. वर्षभरात नाशिक शहर करोनाचा वेगळ्याच संक्रमानातून जात आहे, नाशिककरांनी आपल्या शब्दावर विश्वास ठेवून एकहाती सत्ता दिली आहे, ६६ नगरसेवक ३ आमदार दिले आहेत. केवळ टिका करण्यापेक्षा ज्या नाशिकरांनी आपल्यावर भरवसा ठेवला विश्वास ठेवला त्या नाशिकरांसाठी या कोविड काळात आपण काय करू शकतो, यासाठी आपण काही प्रयत्न केला तर आम्हाला बरे वाटेल. अन्यथा या दत्तक पित्याला नाशिककर कधीही माफ करणार नाहीत.ऑक्सिजन पुरवठयाअभावी दुर्देवाने २४ रुग्णांचा मुत्यृ झाला त्यांची नावे पुढीप्रमाणे :  अमरदीप नगराळे, भारती निकम, श्रावण रा. पाटील, मोहना दे. खैरनार, मंशी सु. शहा , पंढरीनाथ दे. नेरकर, सुनिल झाळके , सलमा शेख , प्रमोद वालुकर, आशा शर्मा, भैय्या सय्य्द, प्रविण महाले, सुगंधाबाई थोरात, हरणाबाई त्रिभुवन, रजनी काळे, गिता वाघचौरे, बापुसाहेब घोटेकर, वत्सलाबाई सुर्यवंशी, नारायण इरनक, संदिप लोखंडे, बुधा गोतरणे, वैशाली राऊत असे असून यामध्ये एकूण १२ पुरूष व १० महिला हे ३३ वर्ष ते ७४ वर्ष दरम्यानचे असून ११ रुग्ण हे ऑक्सिजन बेडवरील व ११ रुग्ण हे व्हेंटीलेटर बेडवरील आहेत. मनपाच्या नविन बिटको रुग्णालयात ४ रुग्ण व शहरातील खाजगी रुग्णालयात १ रुग्ण  हलविण्यात आले. दरम्यान इतर ठिकाणचे डयुरा सिलेंडर व जंबो सिलेंडर मागवून त्यांच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा सुरु ठेवून रुग्णांचे प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. सदयस्थितीत रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत चालू आहे. 

Share: