IMG-LOGO
मुंबई

खांदेपालटामुळे पोलिस अधिकारी नाराज

Thursday, Mar 18
IMG

पांडे हे 1986च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणार्‍या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले.

संजय पांडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; परमबीर सिंह रजेवरमुंबई, दि. १८ मार्च : सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यातील पोलिस दलात मोठे बदल करणार्‍या सरकारसमोर एक नवा पेच उभा राहिला आहे. पोलिस दलातील या तडकाफडकी ‘अदलाबदली’मुळे वरिष्ठ अधिकारी संजय पांडे हे दुखावले गेले आहेत, तर परमबीर सिंह यांनीही बदलीनंतर नव्या ठिकाणी हजर न होता रजेवर जाणे पसंत केले आहे. पांडे हे 1986च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणार्‍या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही. आतादेखील पोलिस महासंचालकपद किंवा मुंबई पोलिस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही. याउलट माझ्या कनिष्ठ अधिकार्‍याला ते पद देण्यात आले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या पत्रात पांडे यांनी सिंह यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. सिंह यांचे काम व्यवस्थित नाही. त्यांनी आपल्याला एका प्रकरणाच्या तपासात सहकार्य न केल्याचेही पांडे यांनी बोलून दाखवले आहे. सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी आज या विभागाचा पदभार स्वीकारणे अपेक्षित होते; मात्र ते सुटीवर गेले.

Share: