बाजारात सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरू आहे. बँका, वित्त संस्था, ऊर्जा , ऑटो, एफएमसीजी या क्षेत्रातील महत्वाच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
मुंबई, दि. १२ मार्च : आर्थिक आघाडीवर कामगिरी सुधारत असली, तरी देशात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांनी पैसे काढून घेण्याला प्राधान्य दिले असून बाजारात चौफेर विक्रीचा मारा सुरू आहे. या पडझडीत सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टीत 200 अंकांची घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांचे अडीच ते तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.बाजारात सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरू आहे. बँका, वित्त संस्था, ऊर्जा , ऑटो, एफएमसीजी या क्षेत्रातील महत्वाच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावरील 30 पैकी 26 शेअर घसरले आहेत. ज्यात ओएनजीसी, नेस्ले, टीसीएस, एल अँड टी, बजाज फिनसर्व्ह , एचयूएल, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बँक, मारुती, बजाज ऑटो या शेअरमध्ये घसरण झाली आहे. पॉवरग्रीड, टायटन, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स हे शेअर तेजीत आहे. आजच्या घसरणीमुळे सेन्सेक्स 51 हजारांच्या खाली आला आहे. सध्या सेन्सेक्स 497 अंकांनी घसरला असून तो 50 हजार 782 अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 140 अंकांनी घसरला असून तो 15 हजार 33 अंकावर आहे. आजच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी जवळपास अडीच ते तीन लाख कोटी गमावले आहेत. निफ्टी मंचावर स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरला मागणी दिसून आली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. रुग्ण वाढू लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. देशात एका दिवसांत कोरोनाचे 22 हजार 854 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 12 लाख 85 हजार 561 इतकी झाली आहे. जवळपास अडीच महिन्यांनंतर देशात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी 25 डिसेंबरला 23 हजार 67 रुग्ण आढळून आले होते. देशात कोरोनाने 126 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढून एक लाख 58 हजार 189 इतकी झाली आहे.