तमीळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी : शाळा-महाविद्यालयांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने शिक्षण विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात सरकार पर्यायी मार्गाचा विचार करणार असल्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. तमीळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केले जाण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच कोरोना रुग्णवाढीमुळे परीक्षेवर भीतीचे सावट आहे. या परीक्षा यंदा तरी होणार का, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे, परीक्षेवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की राज्यात सध्या कोरोनाच्या आकडेवारीने गांभीर्य वाढले आहे. राज्याच्या अर्थकारणाला पुन्हा टाळेबंदी करणे परवडणारे नाही. काही गोष्टींवर निर्बंध आणता येतील, का याचा विचार सुरू आहे. यात लोकलच्या फेर्या कमी करणे, एसटी बसमधील गर्दी कमी करणे, सिनेमागृह-विवाहस्थळे येथे होणार्या गर्दीवर आळा घालणे यासारख्या गोष्टींवर विविध पर्याय शोधावे लागणार आहेत.