कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक जानेवारीपासून कांद्याची निर्यात खुली करण्याचे आदेश जारी केले.
नाशिक, सोलापूर, दि. १ डिसेंबर : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याने कांद्याच्या निर्यातीला चालना मिळाली आहे. कांद्याच्या भावात सरासरी सहाशे ते सातशे रुपये वाढ झाली. येवला तालुक्यातील अंदरसुल उपबाजार आवारातील एका व्यापा-याने 25 टन कांदा श्रीलंका देशातील कोलंबो येथे निर्यात केला आहे. कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक जानेवारीपासून कांद्याची निर्यात खुली करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे कांदा भावातील पडझड लगेल नियंत्रणात आली, तरीही कांदा उत्पादक शेतकर्यांना याचा फायदा होण्यासाठी अजून 22 दिवस वाट पाहावी लागेल. देशातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यात रांगडा अर्थात नवीन लाल कांदा यायला अजून काही दिवस लागणार आहेत. भारताने निर्यातबंदी उठविल्यानंतर बिचकलेल्या पाकिस्तान आणि तुर्कस्तान या देशांनी तत्काळ आपला कांद्याच्या निर्यातीचा दर कमी केला. याचा कोणताही परिणाम भारतीय कांद्यावर होणार नाही, असा विश्वास शेतकरी आणी व्यापारी या दोघांनाही आहे. कांद्याला सध्या 2200 ते 2800 प्रतिक्विंटल भाव असून सरासरी 2400 रुपये भाव आहे. रांगडा अर्थात चार पदरी लाल कांदा दाखल होत आहे. हा कांदा निर्यातीसाठी सर्वोत्तम मानला जातो. जगातील 30 देशात या कांद्याची निर्यात होते. मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर, लंडन, दुबई, अमेरिका, स्वीडन, जकार्ता, बांगला देश, आखाती देश, नेपाळ या देशाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. भारतासह जगात पाकिस्तान,चीन,तुर्कस्तान, कझागिस्तान या देशांमधील कांदाही मोठ्या प्रमाणात विकला जातो. भारतातील निर्यातबंदी रद्द होताच पाकिस्तान आणी तुर्कस्तानमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, खाण्यासाठी आणि चवीसाठी भारतीय कांदा जगात सर्वोत्तम मानला जातो. सोलापुरात निर्यातबंदी उठवल्याचा अद्याप शेतकर्यांना फायदा झालेला नाही. जवळपास तीन महिन्यानंतर कांद्यावर लावण्यात आलेली निर्यातबंदी आजपासून उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांचा कांदा आता परदेशात पाठवता येणार आहे; मात्र पहिल्या दिवशी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची परिस्थिती जैसे थे पाहायला मिळत आहे.