IMG-LOGO
मुंबई

मुंबईतील सोसायट्यांमध्येच लसीकरण करणार

Thursday, May 06
IMG

काही सोसायट्यांनी स्वत: लसीकरणासाठी लागणारी व्यवस्था उभारण्याची तयारी सुरू केली.

मुंबई, दि. ६ मे  : लवकरच मुंबईकरांना त्यांच्या सोसायटीमध्येच कोरोनाची लस उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेने शहरांमधील मोठ्या सोसायट्यांना खासगी रुग्णालयांसोबत टायअप करून लसीकरण मोहीम राबवण्याची परवानगी दिली आहे. सोसायटीच्या आवारामध्ये रुग्णालयांशी बोलून लसीकरण मोहीम राबवता येणार आहे; मात्र यासाठी पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध आहेत का, याबरोबरच कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन केले जात आहे का, याकडेही रुग्णालांनी लक्ष देणे बंधनकारक आहे. या लसीकरण मोहिमेचे दर सरकारने खासगी रुग्णालयांसाठी ठरवून दिलेले आहेत. यासंदर्भात काही सोसायट्यांनी महापालिकेसोबत चर्चा सुरू केली आहे तर काही सोसायट्यांनी स्वत: लसीकरणासाठी लागणारी व्यवस्था उभारण्याची तयारी सुरू केली.गृहसंकुले, इंडस्ट्रीयल पार्क, बँका, मोठ्या कंपन्या कोणत्याही खासगी रुग्णालयासोबत टायअप करून त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या आवारामध्ये लसीकरण करू शकतात. आम्ही लसीकरणासाठी 75 खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. अर्ज येतील त्याप्रमाणे इतर रुग्णालयांनाही आम्ही परवानगी देऊ. रुग्णालयांनी ही लसीकरण केंद्र उभारताना वाट पाहण्यासाठी रांगेत असणार्‍यांसाठी जागा, लसीकरण, लसीकरणानंतर ऑबझर्व्हेशन एरिया यासारख्या गोष्टींबरोबर लसीकरणासंदर्भात इतर नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. ज्यांना मोफत लस हवी आहे, ते मुंबई महापालिकेने उभारलेल्या 227 लसीकरण केंद्रावरून ती घेऊ शकतात. या केंद्रामध्ये मोफत लस मिळेल; पण लसींचा पुरवठा झाल्यानंतरच ही केंद्र सुरू होतील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश कलानी यांनी स्पष्ट केले.लोढा ग्रुपने आपल्या सर्व रहिवासी संकुलांमधील नागरिकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये आम्ही लसीकरणासंदर्भात संबंधित संस्थांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. आम्ही स्थानिक महानगरपालिकांकडून यासंदर्भातील परवानगी मिळवण्यासाठी चर्चा करत आहोत. आम्ही स्थानिक खासगी रुग्णालयांसोबत लसीकरणासंदर्भातील करार केला, असे लोढाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मुलुंडमधील अ‍ॅटमोस्पिअर हाऊसिंग सोसायटीनेही मुंबई महानगरपालिकेची मदत मागितली आहे. खासदार मनोज कोटकसुद्धा त्यांच्या कॉम्पलेक्समध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमच्या संकुलात एकूण 700 घरे आहेत येथे 1500 हून अधिक जण राहतात. आम्ही आमच्या संकुलामध्ये लसीकरण केंद्र उभारण्यासाठी महापालिकेला मदत करू शकतो. तसेच येथे मदत करण्यासाठी काही लोकांची व्यवस्थाही आम्ही करू शकतो. असे केल्याने लोकांना संकुलाच्या बाहेर न पडता इथेच लस घेता येईल, असे संकुलातील रहिवाशी राज कुलकर्णी यांनी सांगितले.कोटक यांनी मुंबई महानगरपालिकेला सेवाभावी संस्थांना खासगी रुग्णालयांसोबत टायअप करून सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. यामुळे लसीकरण केंद्रातील गर्दी कमी करण्यास मदत होईल, असे कोटक सांगतात. दोस्ती एकर्समधील 11 सोसायट्यांच्या वतीने बांधकाम व्यवसायिकांना पत्र पाठवून येथील कम्युनिटी हॉल हा लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आम्ही महापालिकेच्याही संपर्कात आहोत. महापालिकेच्या केंद्रावर प्रचंड गर्दी होईल आणि त्यांच्यावर ताण येईल. त्यामुळे छोट्या छोट्या केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबवली पाहिजे, असे दोस्ती लिली हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष राहुल दागा यांनी सांगितले. तसेच हे केंद्र उभारण्यासाठी सोसायटी खर्च करण्यास तयार आहे असेही दागा म्हणाले.

Share: