प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरू करण्यात येईल.
मुंबई, दि. २२ एप्रिल : राज्यात कठोर निर्बंधामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते म्हणाले, की प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरू करण्यात येईल. प्राध्यापक भरती होणारच नाही, अशा ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर विश्वास ठेवू नये. आज कुलगुरूंसोबत परीक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आता ऊर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचे सामंत यांनी सांगितले. उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. त्यामुळे निकाल लवकर लागेल. राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे. 18 ते 25 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत त्यामुळे त्याचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. लॉच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. तेराही अकृषी विद्यांपीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परीक्षा ऑनलाईन असेल, असे सामंत यांनी सांगितले. एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. संजय ओक यांनी तसे आवाहन केले होते. त्यांच्याशीही मी बोलणार आहे.