महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेने अतिशय भयानक रुप धारण केले आहे.
मुंबई, दि. १० मे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोना महामारीत गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाइन योद्धे आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. यात डॉक्टरांसोबतच पोलिस दलाचे योगदान फार मोठे आहे. देशाच्या सुरक्षा दलांमध्ये मुंबई पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून ते आतापर्यंत मुंबई पोलिसांनी 110 योद्धे कोरोनामुळे गमावले आहेत, तर महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 427 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 54 जणांच्या यंदाच्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेने अतिशय भयानक रुप धारण केले आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचा जीव जात आहेत. रोज नवनवे आकडे समोर येत आहेत. मुंबईत पोलिस आपला जीव धोक्यात घालून शहातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यात अनेक पोलिसांच्या जीवावरदेखील बेतत आहे. ड्युटीवर असताना कोरोनाची लागण होऊन अनेक पोलिस रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. यातील काही जणांना संसर्ग वाढल्याने जीव गमावण्याची वेळ येत आहे. मुंबई पोलिस शहरात गस्त घालणे असो लसीकरण केंद्र असो, मग क्वारंटाइन सेंटर असो अशा सर्व ठिकाणी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. यात कोरोनाच्या परिस्थितीमुळे कामाचा ताण वाढल्याने काही पोलिसांना रोज घरीदेखील जाता येत नाही. टाळेबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली. त्यामुळे एप्रिल-मेच्या कडक उन्हात त्यांना पहारा द्यावा लागतो आहे.दरम्यान, महाराष्ट्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत आणि कुटुंबातील सदस्याला पोलिस दलात नोकरी देण्याचे याधीच जाहीर केले होते; पण ही योजनादेखील गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून मागे घेण्यात आली आहे.