गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमुळे मुंबईतील भांडूप परिसर पुरता हादरून गेला आहे. मुंबई महापालिकेने सहा जणांच्या मृत्यूबाबत माहिती दिल्यानंतर आणखी चार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
32 रुग्णांची माहिती मिळेना; मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीरमुंबई, दि. २६ मार्च : सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. 32 रुग्णांचा अजूनही तपास लागलेला नाही. या भीषण घटनेमुळे मुंबई हादरली आहे. भंडारा जिल्ह रुग्णालयाच्या घटनेला दोन महिने होत नाही, तोच ही गंभीर घटना घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमुळे मुंबईतील भांडूप परिसर पुरता हादरून गेला आहे. मुंबई महापालिकेने सहा जणांच्या मृत्यूबाबत माहिती दिल्यानंतर आणखी चार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. एका मॉलमध्ये हे रुग्णालय सेंटर सुरू होते. त्यात साधारण 500 ते 600 दुकाने सुरू होती. हॉस्पिटलकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले होते, की या रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू आगीमुळे झाला की कोरोनामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ’भांडूपमध्ये ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आणि वरच्या मजल्यावरील सनराइज रुग्णालयापर्यंत या आगीचा धूर पोहोचला. सर्व फायर अलार्म वाजल्यानंतर धुरातून सर्व रूग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याठिकाहून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व रुग्णांना तातडीने जंबो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले (आणि काही इतर खासगी रुग्णालयात) आहे. लोकांचे प्राण वाचविण्यास मदत केल्याबद्दल मुंबईकर अग्निशमन दलाचे आणि मुंबई पोलिसांचे आभारी आहोत, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले होते. भांडूपमधील सनराइज हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. गुरुवारी रात्री आग लागली होती, याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग भडकली. या ठिकाणाहून 32 कोरोना रुग्ण गायब आहेत. त्यामुळे सनकराइज रुग्णालयावर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे. मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे, की कोरोना काळात काही रुग्णालयांना परवानगी देण्यात आली होती, त्यापैकी हे एक रुग्णालय होते. आपली आरोग्यसुविधा आणि वाढती साथ यामुळे राज्यभर जिथे शक्य असेल, तिथे काही कोरोना सेंटर आणि रुग्णालयांना परवानगी दिली होती. या रुग्णालयाला दिलेली परवानगी येत्या 31 तारखेला संपणार आहे. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर आग लागून ती आग पसरत वर पोहोचली. त्याठिकाणच्या कोरोना रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला; पण जे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, त्यांना हलवण्यासाठी थोडा अवधी लागला. दुर्दैवाने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबतीत चौकशी केली जाईल. यामध्ये कुणाचा दोष असेल तर कायद्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणी किंवा त्याबाबत योग्य निर्णय घेणे कठीण असते, असेही ते म्हणाले. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे. ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, स्थानिक आमदार सुनील राऊतदेखील उपस्थित राहून घडल्या प्रकाराची माहिती घेत होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली होती. एका मॉलमध्ये हॉस्पिटलसाठी परवानगी दिली जाते, शिवाय त्याठिकाणी कोव्हिड सेंटरलादेखील परवानगी दिली जाते. त्यामुळे एकंदरितच प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याठिकाणी एकूण 78 रुग्ण होते.गुन्हा दाखल करणारदरम्यान, मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचे सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.अग्नीसुरक्षेचा आदेश धाब्यावरभांडुप येथील सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड रुग्णालयांचे अग्नीपरक्षण तपासण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा नवजात शिशुंचा होरपळून मृत्यू झाला, तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अग्नीपरीक्षा व अग्नी सुरक्षा व्यवस्था लागू करण्याचे आदेश दिले होते. दुर्देवाने आरोग्य विभागाने अग्निपरीक्षण केलेल्या एकाही रुग्णालयात आजपर्यंत अग्नीसुरक्षा व्यवस्था बसविण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनुसार एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग वेगाने काम करत नाही, तर दुसरीकडे निधीची बोंब आहे. अग्नीपरीक्षण व यंत्रणा बसविण्यासाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांची आवश्यकता असून आरोग्य विभागाने यासाठी जिल्हाधिकारी तसेच आमदार- खासदारांकडे पाठपुरावा चालवला आहे.