गोरेगाव पहाडीची जागा मेट्रो कारशेडसाठी द्यावी, अशी विनंती एमएमआरडीएने राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबई, दि. २२ डिसेंबर : राज्य सरकारने मेट्रो सहा प्रकल्पाच्या कारशेडसाठी पर्यायी जागा म्हणून गोरेगाव पहाडीचा विचार सुरू केला आहे. लोखंडवाला-विक्रोळी असा मेट्रो 6 चा मार्ग असून, त्यासाठी गोरेगाव पहाडी येथे कारशेड उभारण्याची राज्य सरकारची तयारी आहे. कांजूरमार्गमधल्या जमिनीवरून सध्या वाद सुरू असून ते प्रकरण न्यायालयात आहे. जर कांजूरमार्गची जमीन मेट्रो कारशेडसाठी न मिळाल्यास प्लॅन बी म्हणून गोरेगाव पहाडीच्या जागेचा मेट्रो कारशेडसाठी विचार केला जाऊ शकतो. गोरेगाव पहाडीची जागा मेट्रो कारशेडसाठी द्यावी, अशी विनंती एमएमआरडीएने राज्य सरकारकडे केली आहे. ही जमीन ताब्यात घ्यायची असल्यास त्या जमिनीच्या मालकाला मालकी हक्क सोडण्यासाठी भरपाई द्यावी लागेल. गोरेगाव पहाडीमधील 129.10 हेक्टरपैकी 89 हेक्टर जमीन सरकारनं मेट्रो यार्डसाठी ताब्यात घेतलेली आहे. त्यातील मेट्रो 6 प्रकल्पाचे 30 टक्के काम पूर्णसुद्धा झाले आहे. आता एमएमआरडीएला कारशेडसाठी गोरेगाव पहाडी भागातील आणखी 18 हेक्टर जमीन हवी आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो 6 प्रकल्पासाठी कारशेड कांजूरमार्गला तयार करायचा प्लॅन आहे. कुलाबा-वांद्रे- सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पाचे कारशेड आरेमध्ये उभारले जात होते; पण त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्याने ते कांजूरमार्गला हलवण्यात आले. तसेच वडाळा- ठाणे या मेट्रो चार मार्गाचेही काम सुरू झाले. त्यामुळे कारशेडचा प्रश्न लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे.आमचा कांजूरमार्गला कारशेड उभारण्याचा विचार आहे; पण न्यायालयाने तिकडे कारशेड तयार करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आम्ही प्लॅन बीचा विचार केलेला असून, मेट्रो 6 प्रकल्पासाठी गोरेगाव पहाडी भागात कारशेड उभारले जाऊ शकते, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. मेट्रो 6 प्रकल्प हा 16 किलोमीटरच्या टप्प्याचा असून, तो जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि विक्रोळी-लोखंडवालादरम्यान बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे सहा हजार 691 कोटी रुपये आहे. 16 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्गच्या 102 एकर मिठागराच्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यास स्थगिती दिली होती, आता या निर्णयावर फेब्रुवारी 2021मध्ये सुनावणी होणार आहे.मेट्रो कारशेडचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, म्हणून बीकेसीचा पर्याय पुढे आल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकार पर्यायी जागांचा शोध घेत आहे. त्यातूनच बीकेसीत मेट्रो कारशेडसाठी जागेची चाचपणी सरकारने सुरू केली आहे. तसे आदेशही सरकारने दिले आहेत.