IMG-LOGO
मंथन

ख्यातनाम संसदपटू मधु लिमये यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात

Monday, May 03
IMG

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने काल १ मे रोजी थोर समाजवादी नेते, विचारवंत मधु लिमये यांच्या जन्मशताब्दीला ऑनलाईन सोहळ्याने प्रारंभ झाला.

राष्ट्र सेवा दलाचा पुढाकारभारतीय राजकारणातील फॅसिस्ट शक्तींचा धोका मधु लिमये यांनी आधीच ओळखला होता. म्हणून सार्वजनिक निंदेची जोखीम पत्करून त्यांनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्तीत केला. संघाच्या विचारसरणीला अखेरपर्यंत विरोध केला, अशा शब्दात राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी मधु लिमये यांना श्रद्धांजली अर्पण केली.राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने काल १ मे रोजी थोर समाजवादी नेते, विचारवंत मधु लिमये यांच्या जन्मशताब्दीला ऑनलाईन सोहळ्याने  प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. 'मी पाहिलेले मधु लिमये' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार,चित्रपट मालिका निर्माते,  राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त नितीन वैद्य यांच्या ऑनलाईन व्याख्यानाने जन्मशताब्दीची सुरवात झाली. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांनीही यावेळी भाषणं केली.डॉ. गणेश देवी यांनी यावेळी सांगितलं की, राष्ट्र सेवा दला तर्फे मधु लिमये यांच्या पुस्तकांची डिजिटल लायब्ररी सुरु करण्यात येईल. त्यांची पुस्तकं विविध भारतीय भाषांत अनुवादित करण्यात येतील. मधु लिमये यांच्या निवडक लेखांच्या पुस्तकाचं संपादन नितीन वैद्य करणार आहेत. राष्ट्र सेवा दल पत्रिकेत मे महिन्याच्या अंकात मधु लिमये यांच्यावरचे शरद पवार, सोमनाथ चॅटर्जी यांचे गाजलेले लेख प्रकाशित करण्यात येणार आहेत.२०२१ यावर्षी सेवा दलाचे चार खांब असलेले मधु लिमये, बॅ. नाथ पै, कविवर्य वसंत बापट आणि यदुनाथ थत्ते यांची जन्मशताब्दी आहे. नाथ पै यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात येईल. वसंत बापट यांना  गाण्यांच्या कार्यक्रमातून अभिवादन करण्यात येईल. यदुनाथ थत्ते यांना युवक मेळावे, पत्रकार संमेलन, साधना वाचक मेळावा आयोजित करून आदरांजली वाहण्यात येणार आहे.नितीन वैद्य यांनी व्याख्यानात मधु लिमये यांच्या जीवनाच्या विविध अंगांचा परिचय करून दिला. ते म्हणाले, मधु लिमये यांचा व्यासंग मोठा आहे. ते ग्रंथप्रेमी होते देशातले लालूप्रसाद यादव, मुलायम सिंग, देवीलाल असे मोठे नेते त्यांचं मार्गदर्शन घेत असत. सभ्य राजकीय मान्यता त्यांना मिळाली होती. त्यांच्या वैचारिक, नैतिक दबदब्यातून ती मिळाली होती. इंग्रजी, हिंदी, मराठी या तिन्ही भाषेत ते राजकीय लेखन करत असत. राजकारणात राहूनही त्यांना संगीतात रस होता. साधी राहणी, वैश्विक विचारसरणी हे त्यांचं वैशिष्टय होतं.  आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले, साने गुरुजी मधु लिमयेंना आपले डोळे मानत असत. मधु लिमयेंच्या विद्वतेचा त्यातून परिचय होतो. मधु लिमये हे राष्ट्र सेवा दलाच्या पुनर्घटनेच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे तरुण नेते होते. मंडल आयोगाच्या चळवळीत त्यांचे योगदान मोठे आहे. बिहारमध्ये गावागावात राम मनोहर लोहिया आणि मधु लिमये यांना लोक मानतात. एवढे ते बिहारच्या जनतेच्या मनात आहेत. यातून मधु लिमये यांच्या नेतृत्वाची थोरवी दिसते. राष्ट्र सेवा दल त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे.राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला तर राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. राज्यभरातून सेवा दल सैनिक या ऑनलाईन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share: