वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू करायची की नाहीत, याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, दि. १९ फेब्रुवारी : कोरोना वाढत असेल तर महाविद्यालये सुरू करण्याबाबत फेरविचार केला जाऊ शकतो असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू करायची की नाहीत, याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेउन जिल्हाधिकारी निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयांनी विद्यार्थांना उपस्थिती सक्तीची करू नये असे ते म्हणाले. ऑनलाईन परीक्षांबाबत येणार्या अडचणींसाठी एक समिती नेमली होती. ही समिती एका महिन्यात त्याचा अहवाल देणार आहे. परीक्षांमध्ये काय अडचणी आल्या, याबाबत नेमलेली समिती व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून सर्व विद्यापिठांचा आढावा घेईल. त्यानंतर जर कोी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई होईल, असे सामंत यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, की कोरोना गेला आहे असे जर कोणाला वाटत असेल तर तसे नाही. संख्या वाढते आहे. आणि हे लक्षात घेता आज विद्यापीठांनादेखील आमच्या सूचना गेल्या आहेत. जर हे असेच कायम राहिले तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला काही विचार करावा लागेल. जिल्हाधिका-यांनी आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करण्याबाबत विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा. त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय विद्यापीठांनी उपलब्ध करुन द्यावेत. विद्यार्थी त्यांच्या घरूनच परीक्षा देऊ शकतात, असेही सामंत यांनी सांगितले.