मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. यात बुकी नरेश धारे आणि निलंबित पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांचा समावेश आहे.
मुंबई दि. २१ मार्च : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीसमोर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा कट हा जानेवारी महिन्यात मुंबई पोलिस आयुक्तालयातच शिजला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. यात बुकी नरेश धारे आणि निलंबित पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांचा समावेश आहे. शिंदे हा वारंवार वाझे यांना भेटायला यायचा. जानेवारी महिन्यात मुंबई पोलिस आयुक्तालयातच स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा कट शिजला होता. मे 2020 मध्ये शिंदे हा पॅरोलवर बाहेर आला होता. तब्बल वर्षभर तो पॅरोलवर बाहेरच होता. फेब्रुवारी 2021 मध्ये शिंदे मुंबई पोलिस आयुक्तालयात आला होता. वाझे यांची त्याने भेट घेतली होती. दोघांमध्ये दोन तास बैठक चालली होती. वाझे यांना त्यांच्या गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयातसुद्धा शिंदे भेटायचा. शिंदेने वाझे यांच्या केबिनबाहेरील पोलिसांकडून पोलिस लोगोच्या मुखपट्या आणि पोलिस लिहलेली निळी पट्टी मागितली होती. वाझे यांच्यानंतर विनायकने मुंबई पोलिस आयुक्तालयातील एका मोठ्या अधिकार्याचीदेखील भेट घेतली होती. तो वरीष्ठ अधिकारी कोण आहे, हे अद्याप समोर येऊ शकले नाही. विनायक शिंदे आणि वाझे यांची ठाण्यातही भेट झाली होती. या कटामध्ये इतरही पोलिस अधिकार्यांचा सहभाग आहे. त्यामुळे पोलिस दलात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.हिरेन यांना तावडे नावाने फोन करणारा शिंदेच?शिंदे हा लख्खन भैय्या बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आहे. शिंदे लख्खन भैया बनावट चकमकीतील मुख्य संशयित आरोपी प्रदीप सूर्यवंशी याचा खास होता. त्याला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली आहे. सूर्यवंशी, शिंदे हे वाझे याचे एकदम खास आहेत. तावडे नावाने मनसुख हिरेन यांन फोन करणारा शिंदे असल्याचे बोलले जात आहे. वाझे याच्या सांगण्यावरून शिंदे याने एक बुकी आणि इतर आरोपींची जुळवाजुळव केल्याचा एटीएसला संशय आहे.