IMG-LOGO
साहित्य संस्कृती

प्रवास एका प्रेरणादायी यशोगाथेचा

Saturday, Mar 20
IMG

डॉ. आशुतोष रारावीकर. सर्वार्थाने अर्थपूर्ण जीवन जगणारा आणि इतरांच्याही जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, साहित्यकार, तत्वज्ञ आणि विचारवंत.

जीवनाच्या जलाशयात विहार करणार्‍या नौकांसाठी विचारांचा दीपस्तंभ हा मार्गदर्शक असतो. ख्यातनाम अर्थतज्ञ, लेखक व रिझर्व्ह बँकेत संचालक पदावर कार्यरत असलेले एक बहुरंगी आणि कर्तबगार व्यक्तिमत्व डॉ. आशुतोष रारावीकर यांचा दूरदर्शन सह्याद्रीवर ‘यशस्वी जीवनाचा प्रवास उलगडतांना’ हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. अतिशय रंगतदार अशा या संवादरूपी कार्यक्रमाचे निर्माते होते दूरदर्शनचे डॉ. आलोक खोब्रागडे आणि प्रवाही भाषेत सूत्रसंचालन केले डॉ. मृण्मयी भजक यांनी. सर्व वाचकांसाठी डॉ. रारावीकर यांच्या सर्वस्पर्शी विचारपुष्पांचा हा शब्दगंध.डॉ. आशुतोष रारावीकर. सर्वार्थाने अर्थपूर्ण जीवन जगणारा आणि इतरांच्याही जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, साहित्यकार, तत्वज्ञ आणि विचारवंत. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये संचालक पदावर कार्यरत. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातही संचालक पदावर कार्य. अत्यंत गौरवपूर्ण शैक्षणिक कारकीर्द असलेले उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व. बारावीत संपूर्ण बोर्डात सर्वप्रथम आणि सुवर्णपदकाचे मानकरी. शासनाची प्रतिष्ठेची टॉपर्स स्कॉलरशिप व इतर अ‍नेक शिष्यवृत्त्यांनी गौरव. अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण. तरुण वयात रिसर्च फेलोशिपसह अर्थशास्त्रात डॉक्टरेट. बँकिंग क्षेत्रातील सी.ए.आय.आय.बी. व अध्यापन क्षेत्रातील ‘नेट’ हेही किताब. अमेरिकेच्या प्रख्यात सीएफए इन्स्टिट्युटतर्फे इन्व्हेस्टमेन्ट फ़ाउंडेशन सर्टिफिकेट आणि अमेरिकेतील आय. एम. एफ., हार्वर्ड व एम. आय. टी. तर्फे फायनांशियल प्रोग्रॅमिंग व पॉलिसीमधील सन्मानपत्र प्रदान. विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चांमध्ये महत्वाची भूमिका.  विविध प्रकारच्या पुरस्कारांनी बहुमान. प्रसार-माध्यमांकडूनही गौरव. आर्थिक व इतर विषयांवर नऊ पुस्तके व अनेक लेख प्रसिद्ध. भारत सरकारच्या ‘इकॉनॉमिक सर्व्हे’ व रिझर्व्ह बँकेच्या प्रकाशांनमध्येही योगदान. ‘यशपुष्प’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे मराठी साहित्याचा मानबिंदू. शिक्षण क्षेत्रातही योगदान. लोकप्रिय आणि श्रोत्यांवर मोहिनी घालणारा सुप्रसिद्ध वक्ता. सुरेल गळा असलेला गायक. अनेकविध पैलू पडलेला, बहुआयामी प्रतिमा असलेला आणि तरीही अतिशय विनयशील असा एक मनोहर कोहिनूर हिरा. डॉ. आशुतोष रारावीकर यांच्या मुखातून... माझ्या आयुष्याच्या जडणघडणीचे शिल्पकारनाशिक या पुण्यनगरीत माझा जन्म झाला आणि गोदावरीच्या पवित्र प्रवाहाबरोबर माझा जीवनप्रवाह सुद्धा पुढे जात राहिला. माझे वडील – दादा - प्रा. डॉ. यशवंत रारावीकर हे ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ  होते. ते सात्विकतेची आणि करुणेची मूर्तिमंत प्रतिमा होते. त्यांनी मला मर्मग्राही दृष्टी दिली.  माझी आई प्रा. डॉ. सौ. अरुणा रारावीकर ही एक अध्यात्म मूर्ती, संस्कृततज्ञ आणि साहित्यिक होती. ती साक्षात चालती-बोलती भगवद्गीता होती. तिच्या छत्रछायेत भगवद्गीता ही वाचायच्या आधीच मला कळली. आई मला म्हणायची, तू आयुष्यात खूप काही मिळव, त्यामुळे दुसर्‍यांना जास्त देता येईल. मिळवायचं ते देण्यासाठी, हा संस्कार आईच्या गर्भात असतांनापासून माझ्यावर झाला. आई-दादा हे मानवतेचा झरा होते. भाषा, विचार, आचार ही शुद्धतेची त्रिमूर्ति होते. त्यांनी मला कल्पवृक्षाची छाया दिली. त्यांनी माझा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास केला. लहानपणी त्यांनी मला चालायला आणि बोलायला शिकवलं. अजूनही त्यांचंच बोट धरून चालतो आहे आणि त्यांचीच भाषा बोलतो आहे. आई-दादांनी मला जीवनाचं शास्त्र शिकवून त्याला 'अर्थ' दिला. आशुतोष हे माझं नाव ठेवून ‘प्रसन्नता’ हा जीवनाचा आत्मा आहे, हा जीवनाच्या यशाचा मंत्र दिला. आपण जन्म दिलेलं आणि विकसित केलेलं मूल जीवन कसं जगतं आणि इतरांची जीवन कशी घडवतं हे पाहणं, ही मातापित्यांसाठी सगळ्यात समाधानाची बाब असते. यशपुष्प हे पुस्तक माझ्या आई-दादांचं मी उभारलेलं अजरामर स्मारक आहे. तसेच गुरु आणि कुटुंबीय यांचंही माझ्या जीवनात फार मोठं स्थान आहे. शालेय जीवनात शिकवणारे श्री. गुप्ते, गाडगीळ व ओसवाल सर, आध्यात्मिक गुरु नारायणकाका ढेकणे महाराज, डॉ. नागेंद्रजी व विष्णूमहाराज पारनेरकर, माझी पत्नी वीणा आणि सुपुत्र मिहिर या सर्वांचं माझ्या जीवनात अद्वितीय योगदान आहे. शिवाय लहानपणापासून शेजारी आणि आजोबा या नात्यांमधून लाभलेल्या कुसुमाग्रजांच्या प्रदीर्घ सहवासातून झालेला साहित्याचा परिसस्पर्श मला प्रकर्षाने आठवतो. यशपुष्प पुस्तकाची पार्श्वभूमी, विषय, वैशिष्ट्ये व रचना  करोनाच्या पार्श्वभूमीवर नैराश्याचा अंध:कार पसरला. अशा या काळात मी हे पुस्तक लिहिलं आहे. जीवनाची आशा संपुष्टात आली होती. माणूस जेव्हा घनघोर अंधारात सापडतो तेव्हाच तो फक्त  प्रकाशाचा सर्वात जास्त, किंबहुना एकमेव विचार करतो. जेव्हा सर्व बाजूंनी अंधार पसरतो तेव्हा अंत:शक्ती जागृत होते आणि प्रकाशाचा मार्ग सापडतो. हे पुस्तक लिहिण्यासाठी ही सर्वात आवश्यक वेळ होती.  कारण ‘जीवन’ या शब्दाचा सगळ्यात जास्त विचार गेल्या संपूर्ण शतकात या काळात झाला. तमसो मा ज्योतिर्गमय. प्राचीन भारतीय संस्कृतीने अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा जो राजमार्ग दाखवला, तोच एका नवीन स्वरुपात, नवीन पद्धतीने, वेगळ्या, सोप्या, आधुनिक आणि परिणामकारक भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. जीवनाची आशा जागृत करण्याचं आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम याद्वारे करता आलं. हे पुस्तक म्हणजे मानवजातीच्या सेवेची मला मिळालेली मोठी संधी आहे. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ मी आर्थिक क्षेत्रात काम करतोय. अर्थशास्त्र पैशाविषयी बोलतं. जीवनाला अर्थ देण्यासाठी पैसा हा आवश्यक असला तरी पुरेसा नाही. त्यामुळे मला असं वाटलं की आपण जीवनाला सर्वार्थाने अर्थ प्राप्त करून देणार्‍या शास्त्राबद्दल लिहिलं पाहिजे. जीवनात काय हवं असं विचारलं तर अनेक उत्तर मिळतील. पण या सगळ्यांचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर एकच शब्द – ‘यश’. हवं असलेलं प्राप्त होणं म्हणजे यश. प्रत्येकाला हव्या असलेल्या गोष्टी वेगळ्या असतात. पण सगळ्यांची इच्छा मात्र एकच – यशप्राप्ती. ती कशी करायची ते सांगणारं, जीवनात सुयश मिळवण्याचा राजमार्ग दाखवणारं हे पुस्तक. यश मिळण्यासाठी जीवन कसं जगायचं ते समजणं आवश्यक असतं. ते सांगण्याचं काम हे ‘विचार’ करतात. विचार ही शक्ती असते, जीवनात ती क्रांती घडवते आणि दु:खापासून मुक्ती देते. वार्‍याची दिशा नदीचा प्रवाह बदलतो त्याप्रमाणे विचारांची दिशा जीवनाचा. विचारांना दिशा देऊन जीवनाचा प्रवाह आल्हाददायक बनवणारं हे पुस्तक. यशस्वी जीवनासाठी विचारांचा पुष्पगुच्छ. हे विचार मला माझ्या आईवडिलांनी दिले. वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा. म्हणून पुस्तकाचं नाव 'यशपुष्प'. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की ते कोणत्याही पानापासून वाचता येतं. पानांवर नंबरच घातलेले नाहीत. पण तरीही ते संपूर्णपणे वाचलं पाहिजे. ‘जीवन’ या विषयावर असंख्य पानं आजपर्यंत लिहिली गेली आहेत. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात एवढं वाचायला कोणाकडे पुरेसा वेळ नसतो. व्हाटसप व इंटरनेट मुळे महितीचा महापूर झाला आहे. त्यामुळे जेवढं कमी पण मार्मिक असेल तेवढं ते वाचणार्‍याच्या जास्त लक्षात राहतं. म्हणून या ग्रंथातले विचार  मी कमी शब्दात मांडले आहेत. हे विचार अतिशय प्रभावी आहेत. सध्या इन्स्टंट चा जमाना आहे. हे विचार क्षणार्धात परिणाम करतात. अनेक विचार इतके अर्थपूर्ण आहेत की त्यातल्या एकेका विचारावर काही पानं लिहिता येतील. आणि ते अमलात आणले तर आयुष्य बदलून जाईल. यातील भाषा अतिशय सोपी आहे. भाषेची आणि अर्थाची सुंदरता हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. औषध चविष्ट असेल तर प्रकृती सुधारतांना चवीचाही आनंद घेता येतो. त्यामुळे जीवनोपयोगी विचार शिकतांना आनंदही मिळतो. यात निखळ विनोद आहेत. बोचरेपणा नाही, टोमणे नाहीत. मनाला ते निर्मळ आनंद देतात. या एकाच ग्रंथोबामध्ये हास्य, करुण, शांत, वीर, रौद्र, अद्भुत असे साहित्यातले अनेक रस भरलेले आहेत. हे पुस्तक कोणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी संबंधित नाही. पण तरीही प्रत्येक वाचकाला त्यात स्वत:चं प्रतिबिंब कुठेतरी दिसेल.  या ग्रंथोबाचे चार भाग आहेत. ‘गंध अंतरिक्षाचा’ यामध्ये जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे विचार आहेत. जीवन जगणं ही एक कला आहे. त्यामुळे आयुष्याच्या विविध अवस्थांमध्ये आणि परिस्थितीत नक्की काय करायचं, याचा निर्णय प्रत्येकासाठी पावलोपावली मोठा कठीण असतो. आणि या प्रश्नाची उत्तरं कुठेही लिहिलेली नसतात. याबाबतीत मार्गदर्शक असे विचार यात आहेत. आपला कार्यभाग साधण्यासाठी बर्‍याचदा माणसं कधी जाणूनबुजून तर कधी नाईलाजास्तव अनैतिकपणे वागतात. तर काही माणसं सचोटीने वागूनसुद्धा व्यावहारिकता न कळाल्यामुळे जीवनातल्या मोठ्या लाभांना मुकतात. नैतिकता न सोडता पण मुत्सद्देगिरीचा अवलंब करून जीवनाचा राजमार्ग कसा चालायचा आणि आपल्या इच्छित मुक्कामावर कसं पोहोचायचं या विभागात आहे. ‘स्मितलहरी’ या भागात खळखळून हसवणारे निखळ आणि निर्मळ विनोद आहेत. हास्यरसाची निर्मिती ही परमेश्वराची सर्वाधिक मनमोहक कलाकृती. हसणं हे जीवनाचं सार आहे. हसल्यावाचून आपला दिवस आणि जीवन हे दोन्ही पूर्ण होत नाहीत. यातील विनोदात विविधताही आहे. ‘लॉकडाउनच्या काळात’ या विभागात नुकत्याच झालेल्या आणि शतकातल्या अभूतपूर्व अशा या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणारे काही विनोदी आणि काही जाता जाता अंतर्मुख करणारे विचार आहेत. करमणूक करता करता जे अंतर्मुखही करतं आणि जगण्याचा मार्ग दाखवतं ते साहित्य मौल्यवान असतं. ‘पुष्पांजली परमेशाला’ हा विभाग म्हणजे या पुस्तकाची भैरवी आहे. मानवी जीवनाच्या करुणोदात्ततेला केलेला हा भावस्पर्श आहे. काही विचार असे आहेत :जीवनाला अर्थ देतं ते अर्थशास्त्र.जीवन पूर्णत्वाला नेतं ते पूर्णशास्त्र,या दोन्हींचा संगम हे 'अर्थपूर्ण' शास्त्र.जीवन-यशाची त्रिसूत्री:विज्ञानाचं यंत्र, कौशल्याचं तंत्र आणि अध्यात्माचा मंत्र.माणसांच्या खर्‍या जाती दोनच – सुखी आणि दु:खी आपण आपली जात बदलू शकतो. ससा की कासव हा प्रश्न नाहीआपल्याला सशाची गती आणि कासवाची चिकाटी हे दोन्ही हवं आहे. सूर्योदय असो वा सूर्यास्त,किरण सोनेरीच असतात.इतर काही विचार मानवी जीवनाचं ध्येय आणि प्रवासाची दिशा, वेळेच्या नियोजनाचं महत्व, प्रयत्नवाद आणि प्रयत्नांची दिशा, सुखाचं रहस्य, जीवनाची नीतिसूत्र आणि तंत्र, धोरणाची दिशा, जीवनमूल्ये, आशावाद असे आहेत.काही विनोदी विचार: मी नेहेमी बायकोचं राशिभविष्य वाचतोत्यावरून माझ्या ग्रहमानाचा अंदाज आपोआप येतो. कॉम्प्युटरच्या कमांड्स मला समजत नाहीत,कारण मला फक्त बायकोच्या कमांड्स ऐकण्याची सवय आहे.'मी कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलो' हा आई-वडिलांच्या चिंतेचा विषय, तर 'हे नक्षत्र आपल्याच राशीला कसं आलं' हा पत्नीच्या.माझ्या ‘अर्थ’पूर्ण प्रवासाविषयी मी जे शिक्षण घेतलं त्यातच काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य. कोणतंही शास्त्र हे ज्ञानाचा अथांग सागर असतो. अनेक जन्म घालवले तरी आपल्याला नवीन काहीतरी मिळत राहतं. मला यात सखोल जाण्याची संधी मिळत आली. अर्थशास्त्र हे माणसाच्या मूलभूत आणि सर्व भौतिक गरजा भागवण्याचं काम करतं. हे फार महत्वाचं आहे. आर्थिक क्षेत्रात इतकी वर्षे काम करतांना या शास्त्राचा समाजाच्या, देशाच्या आणि अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हाच माझा दृष्टिकोन राहिला आहे. देशाची आर्थिक सूत्र असलेल्या संस्थांमध्ये – रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय – मला काम करण्याची संधी मिळाली. आर्थिक धोरणं ठरवण्याच्या आणि त्यांची अम्मलबजावणी करण्याच्या कार्यात योगदान देता आलं.  आर्थिक धोरणांमुळे असंख्य माणसांची आयुष्य बदलत असतात, उंचावत असतात. प्रत्येक धोरणामागे विश्लेषण, अभ्यास  आणि संशोधन असतं. त्यात अर्थशास्त्रज्ञांची भूमिका फार महत्वाची असते. मला आनंद आहे की संपूर्ण जगात गौरव आणि प्रतिष्ठेचं स्थान असलेल्या आणि देशाच्या जडणघडणीमध्ये गेली ८५ वर्षे सर्वार्थाने कार्यरत असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या परिवाराचा मी सदस्य आहे. ही देशसेवेची आणि लोकसेवेची फार मोठी संधी आहे आणि या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात खारीचा वाटा मला उचलायला मिळत आला आणि मिळतोय ही समाधानाची बाब आहे. मी पुस्तकं, लेख लिहिले, व्याख्यानं दिली. लेखणी आणि वाणी याद्वारे जंनजागृती आणि आर्थिक साक्षरतेचं काम मला करायला मिळालं. ज्यांच्यासाठी सगळं अर्थकारण असतं त्या लोकांना त्याचा अर्थ, कारण आणि परिणाम हे समजावून सांगणं महत्वाचं असतं. एकंदरीत या अर्थपूर्ण प्रवासाच्या संधीबद्दल – प्रवास जो आतापर्यंत झाला आणि अजून बराच बाकी आहे - मी देशाचा ऋणी आहे. सेवा अशीच घडत राहावी ही इच्छा.यशाची सूत्रे आणि निकषयशाला सात्विकतेचं अधिष्ठान हवं. शरीरस्वास्थ्य, उपासना, प्रत्येक कामाशी आणि नात्याशी प्रामाणिकता, नि:स्वार्थ प्रेम, समतोल, संयम आणि दातृत्व हे यशाचे सात मंत्र आहेत. यशाच्या सप्तसुरांचा साज चढला तर जीवनाच्या मैफलीत रंगत येते. दु:खाकडून कायम किंवा दीर्घकाळ टिकणार्‍या सुखाकडे प्रवास म्हणजे यश. आपल्या मनातले सहा विकार दु:ख देतात. म्हणून हे विकार कमी होत असतील तर समजावं की आपण यशस्वी होत आहोत. माझ्या यशाची दोन सूत्रे आहेत. योग्य मार्ग दाखवणार असेल तर त्या त्या बाबतीत कोणालाही गुरु मानण्याची माझी तयारी असते, आणि ध्येय छोटं असो किंवा मोठं, ते प्राप्त होईपर्यंत मी तपश्चर्या थांबवत नाही. जीवनातील आध्यात्मिकतान त्वहम् कामये राज्यम् न स्वर्गम् नापुनर्भवम्।कामये दु:खतप्तानाम् प्राणिनामार्तिनाशनम्।।(मला स्वर्ग, राज्य, मुक्ती काही नको. फक्त इतरांचं दु:ख दूर व्हावं हीच इच्छा).हे माझ्या जीवनाचं ब्रीदवाक्य आहे.  अध्यात्म हा आत्मिक उन्नतीचा राजमार्ग आहे. परम आनंदाचा प्रवास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आणि संपूर्ण श्रद्धा ठेवून पुढे गेलं पाहिजे. प्राचीन भारतात विकसित झालेलं अध्यात्मशास्त्र हे जीवनाचं पूर्णत्वाला गेलेलं शास्त्र आहे. ते महान अशा संस्कृत भाषेत आहे. संस्कृत नाटकांमध्ये एकही शोकांतिका नाही. जीवनाचा समारोप सुखद झाला पाहिजे ही भारतीय संस्कृतीची धारणा आहे. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग हे चार महत्वाचे मार्ग आहेत. फळाशी आसक्ती न ठेवता योग्य दिशेने कर्म करणं आवश्यक असतं. प्रयत्न हा सुद्धा आनंदाचा मोठा भाग आहे. आपल्याला शब्दाकडून नि:शब्दाकडे रंगाकडून अंतरंगाकडे आणि अंतरंगाकडून पांडुरंगाकडे जायचं आहे. संगीतअर्थशास्त्र हा माझा श्वास आहे, अध्यात्म हा माझा प्राण आहे आणि संगीत हा माझा आत्मा आहे. गायन हा माझ्यासाठी समाधीचा क्षण असतो. निषादाचा नाद, गंधाराचा गंध आणि धैवताची धुंदी हीच माझी समाधी. मी लहानपणापासून गातो, शिकतो. प्रामुख्याने शास्त्रीय. गायनाची देणगी मला आईने दिली. ती उत्तम गायिका होती. संगीतातील माझे गुरु दादासाहेब खरवंडीकर, दसककर गुरुजी आणि आता सुरेश बापट सर. त्यांचा मधुर आवाज, संगीतातला व्यासंग आणि अद्वितीय अध्यापन क्षमता हे मला मोहून टाकतात. संगीत ही अंतरात्म्याची शक्तीतीच भक्ती, तीच मुक्ती.मला सगळे राग आवडतात. फुलांप्रमाणे प्रत्येक रागाचा आनंद वेगळा असतो. भूपाळीच्या मंगलमय स्वरांनी प्रारंभ होऊन भैरवीच्या करुणोदात्त स्वरांनी सांगता व्हावी हे जीवनाचं परम भाग्य.  समारोपबोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं म्हणतात. मी आधी चालतो आणि मग त्याप्रमाणे बोलतो. आणि जे बोलतो ते सगळं आचरणात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.  सगळ्यांसाठी माझी प्रार्थना आहे : डोक्यावरचं छत्र कधी न हरपावं पायाखालची जमीन कधी न सरकावी जीवनपथावरचं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडावंवेदना मिटावी, चेहेर्‍यावरचं हास्य सदैव फुलावंपरमेशाचं नाम कधी न विसरावं, जीवन मंगलमय व्हावंजीवनाच्या नंदनवनात यशाचं प्रफुल्लित हास्यपुष्प प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर फुलावं - हेच ‘यशपुष्प’. 

Share: