IMG-LOGO
साहित्य संस्कृती

योग : व्यक्तीला समाजाशी जोडण्याची साधना

Friday, Jun 21
IMG

प्रत्येक आंतरराष्ट्रीय योग दिनासोबत योगाबद्दलची आपली समजही वाढत गेली पाहिजे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सुरू आहे. आजच्या गुंतागुंतीच्या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लोक सहजच योगाकडे वळत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे लोकांमध्ये योगाबद्दल जागरुकता निर्माण होत आहे. वैयक्तिक आयुष्यात योगाचा उपयोग करण्याची संधी त्यांना मिळत आहे. योगदिन झाल्यानंतरही आपण आसन आणि प्राणायाम अभ्यासात सातत्य ठेवले, तर निश्चितच निरोगी शरीर आणि शांत मनाची अनुभूती येऊ लागेल.   पण शांततेचा खोलवर अनुभव घ्यायचा असेल आणि आपले खरे स्वरूप जाणून घ्यायचे असेल, समाजातच आत्मीयता अनुभवायची असेल, तर आपल्याला योग तत्त्वज्ञान पूर्णपणे समजून घ्यावे लागेल. प्रत्येक आंतरराष्ट्रीय योग दिनासोबत योगाबद्दलची आपली समजही वाढत गेली पाहिजे.    योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम नसून ते एकत्वावर आधारित जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. योग म्हणजे जोडणे; अर्थात ईश्वराशी जोडणे; शरीर-मन-बुद्धी यांचे आत्म्याशी जोडणे; आणि व्यक्तीला समष्टीशी जोडणे. म्हणून ऋषी पतंजली अष्टांग योगाच्या तत्त्वज्ञानात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांना योगाचे अंग म्हटले आहे. पतंजली महर्षींनी ह्यांना योगाच्या पायऱ्या म्हटले नाही तर त्यांना अष्टांग – आठ अंगे म्हटले आहे, याचा अर्थ आपल्याला सर्व आठ अंगांचा अभ्यास रोज करायचा आहे.    आसन आणि प्राणायाम रोज करायचे आहे. आपण हा अभ्यास 24 तास करू शकत नाही. पण यम चा अभ्यास २४ तासांसाठी आहे. का ? आपण यम म्हणजे काय हे समजून घेऊन ते जाणू शकतो. यम पाच आहेत - अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अहिंसा- आपल्या बोलण्याने किंवा कृतीने कोणाला दुखवू नका. सत्य – सर्वांशी प्रामाणिक असणे आणि बोलणे. अस्तेय - चोरी न करणे.  दुसऱ्यांची वस्तू घेतली तरच चोरी होते असे नाही. चोरीचा आणखी एक अर्थ आहे. आपण समाजाकडून, सृष्टीकडून खूप काही घेऊनही जर आपल्या जीवनात त्यांच्यासाठी काही करत नसू तर तीही एक चोरीच आहे. त्यामुळे अस्तेयचा अर्थ आहे समाजाच्या हितासाठी, समष्टीच्या हितासाठी कार्य करणे. ब्रह्मचर्य याचा अर्थ आहे श्रेष्ठ तत्व मिळवण्यासाठी संयमित जीवन जगणे.   अपरिग्रह - याचा अर्थ आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू गोळा न करणे होय. कारण प्रत्येक व्यक्तीने अपरिग्रहाचे पालन केले तर पृथ्वीवर प्रत्येकाच्या गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील, इतकेच नाही तर सृष्टीचेही रक्षणही होईल.   बारकाईने पाहिले तर योगशास्त्रातील यम साधना ही समष्टीचे संवर्धन आणि संरक्षणासाठी आहे. सर्वांशी संबंध चांगले राहावेत आणि सर्वांचे कल्याण व्हावे यासाठीच यम साधना सांगितली आहे. कारण शांतता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यात आपण जितके जास्त योगदान देऊ, तितकेच आपण स्वतःमध्ये योग्यरित्या डोकावून पहायला लागू. ध्यान करू शकू, आणि आपल्या चित्त आणि वृत्तींचा निरोध करण्यास सक्षम होऊ.म्हणूनच ऋषी पतंजली म्हणतात की, यम अभ्यास 24 तास करावा लागेल. त्यासाठी ते सूत्र देतात, – एते जातिदेशकालसमयानवछिन्ना: सार्वभौमा महाव्रतम्। पतंजली म्हणतात, यम महाव्रत आहे आणि ही महाव्रते प्रत्येक जातीने करायची आहेत, प्रत्येक देशात म्हणजे प्रत्येक स्थानी करायची आहेत. प्रत्येक कालखंडात, म्हणजे बालपण, तारुण्य, परिपक्वता आणि वृद्धावस्थेत करायची आहेत. प्रत्येक वेळी करायची आहेत. म्हणजे जात, स्थान, काळ, वेळ सांगून हे व्रत न मोडता पाळायचे आहे.  साधारणपणे माणूस स्वार्थी असतो. त्याचे शरीर आणि मन त्याला फक्त भौतिक पातळीवरच खेचण्याचा प्रयत्न करत राहतात. त्याला आपले जीवन चांगले बनवायचे असेल, भगवंताशी एकरूप व्हायचे असेल, तर स्वार्थातून बाहेर पडून सर्व जगाच्या कल्याणासाठी वागण्याची साधना त्याच्या जीवनात आवश्यक आहे. तसे पाहिले तर, त्याने त्याच्या स्वत: च्या अस्तित्वासाठीसुद्धा समष्टीचे संवर्धन करणे आवश्यक आहे, कारण व्यक्ती समष्टीचा भाग आहे. म्हणूनच पतंजली ऋषींनी यम अभ्यासाला खूप महत्त्व दिले आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, आपण योगशास्त्र समाजात घेऊन जात आहोत आणि लोकांना शिकवत आहोत, अशा वेळी आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की योग म्हणजे केवळ आसन, प्राणायामचा अभ्यास नाही, तर ती एकत्वावर आधारित जीवनपद्धती आहे आणि म्हणूनच जेव्हा आम्ही आसन आणि प्राणायाम शिकवू, आम्ही प्रत्येकाला योगाच्या इतर भागांची थोडीशी ओळख करून देऊ.   योगाभ्यासाची पहिली पायरी म्हणजे व्यक्तीला समाजाशी जोडणे. समाजाच्या रूपाने प्रगट झालेल्या भगवंताशी नाते जोडणे म्हणजेच समाजहिताचे कार्य करणे हा योग होय. भगवंत जो सर्वव्यापी आहे आणि स्थळ, काळ आणि कारणाच्या पलीकडे आहे, त्याच्याशी धारणा, ध्यान आणि समाधीमध्ये एकरूप व्हायचे आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिन हे भारतासाठी आपले नियत कार्य करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे. भारताचे नियत कार्य काय आहे? मानवजातीला स्वार्थाच्या वर उचलून समाजाच्या आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कार्य करणे, त्यांना ईश्वराची, म्हणजेच त्यांच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देणे. हे शिकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाच्या आठ अंगांची आपण चर्चा करू, तर आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उद्देश पूर्ण होईल.  - डाॅ. निवेदिता भिडे राष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी  पद्मश्री प्राप्त असून योग विषयातील जाणकार आहेत.

Share: