१८ गुणांसह मुंबई इंडियन्सनं अव्वल स्थान पक्कं केलं असलं तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) उर्वरित दोन सामने जिंकून १८ गुणांसह अव्वल स्थान पटकावू शकतात.
दुबई, दि. ३१ ऑक्टोबर : आयपीएलच्या आजच्या पहिल्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला आहे. दिल्लीला ९ बाद ११० धावांवर समाधान मानावे लागले. दिल्ली कडून एकट्या कर्णधार श्रेयस अय्यर याने सर्वाधिक २५, तर ऋषभ पंत याने २१ धावा केल्या. इतर फलंदाज मुंबईच्या धारधार गोलंदाजीपुढे टिकू शकले नाही.इशान किशन-क्विंटन डी'कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. क्विंटन डी'कॉक २६ धावांवर माघारी परतला. इशान किशननं नाबाद अर्धशतक झळकावून मुंबईला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मुंबईनं १४.२ षटकांत लक्ष्य पार केले. किशन ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यानंतर दिल्लीचे १३ सामन्यांत १४ गुण झाले आहेत, तर मुंबईच्या खात्यात १३ सामन्यांनंतर १८ गुण झाले आहेत.१८ गुणांसह मुंबई इंडियन्सनं अव्वल स्थान पक्कं केलं असलं तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) उर्वरित दोन सामने जिंकून १८ गुणांसह अव्वल स्थान पटकावू शकतात. तरीही मुंबई इंडियन्स अव्वल दोन स्थानांपैकी एकावर कायम राहून क्वालिफायर १ साठी पात्र ठरतो. त्यानुसार मुंबई इंडियन्सला दुबईत क्वारलिफायर १ सामना खेळावा लागेल. मुंबई कडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. नाथन कुलटर नाईल आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी 1 बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.या मॅचनंतर पॉईंट्स टेबलमध्ये फरक पडला नसला तरी या निकालामुळे पंजाब, राजस्थान, कोलकाता आणि हैदराबाद यांच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या आहेत, कारण दिल्लीचा नेट रनरेट उणे झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या क्रमांकावर कायम आहे.