केंद्राच्या युवा आयामांतर्गत युवकांच्या व्यक्तिमत्व आणि नेतृत्व शिक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात राष्ट्रभक्ती, साहस, सेवा व बौद्धिक या चार बिंदूवर आधारित कार्यक्रम राबविले जातात.
रायगड, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या जयघोषात रविवारी (ता. २३) दुपारी दुर्ग दुर्गेश्वर श्री रायगडावर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांताच्या युवा नेतृत्व विकसन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या ३४० युवक - युवतींनी गडावर चढाई करतानाच प्लास्टिक कचरा गोळा केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात राष्ट्रसेवेसह वैयक्तिक संकल्प केला. यावेळी उपक्रमासाठीच्या पुस्तकाचे व भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. गेल्या २९ वर्षांपासून विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांताकडून महाविद्यालयीन युवक - युवतींच्या व्यक्तिमत्त्व व नेतृत्व विकसनासाठी युवा नेतृत्व विकसन उपक्रम राबविण्यात येत आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यंदा युवा नेतृत्व विकसन उपक्रमांतर्गत ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर लिखित अष्टावधानी शिवराय या पुस्तकावर आधारीत परीक्षा घेण्यात येणार आहे. या पुस्तकासह भित्तिपत्रकाचे केंद्राच्या प्रांत संघटक सुजाता दळवी, प्रांत युवाप्रमुख सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रांत युवाप्रमुख कुलकर्णी म्हणाले, केंद्राच्या युवा आयामांतर्गत युवकांच्या व्यक्तिमत्व आणि नेतृत्व शिक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात राष्ट्रभक्ती, साहस, सेवा व बौद्धिक या चार बिंदूवर आधारित कार्यक्रम राबविले जातात. यंदा आपण या उपक्रमाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडासारख्या पवित्र व प्रेरक ठिकाणी शुभारंभ करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातच नव्हे तर जगभरात आदर्श राजे म्हणून ओळखले जातात. त्यांचा निश्चयाचा महामेरू म्हणून गौरव केला गेला आहे. युवक - युवतींनी त्यांच्या आदर्शाचे स्मरण करीत गुण अंगीकारावेत. सेवेचा निश्चय करीत त्याला कृतीची जोड द्यावी. रायगडावर अनेक संकल्प सिद्धीस गेले आहेत. त्यामुळे वैयक्तिक विकसनासाठीही संकल्प करावा. याप्रसंगी केंद्राचे प्रांत सहसंघटक सुमीत शिवहरे, निधी संकलन प्रमुख संजय कुलकर्णी, कार्यपद्धती प्रमुख मदगोंडा पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक देवगिरी विभाग युवाप्रमुख लखन अवस्थी यांनी केले. वैदेही पाठक हिने शिवदुर्गेच्या दूतांची हे गीत गायिले. चित्रा सेनगावकर हिने विवेकवाणी म्हटली. केंद्र प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. युवा नेतृत्व विकसन उपक्रमाची प्रक्रिया वरिष्ठ महाविद्यालयीन युवक - युवतींसाठी अष्टावधानी शिवराय या पुस्तकावर आधारीत परीक्षा, एकदिवसीय स्थानिक शिबिर, दर रविवारी स्वाध्याय व सेवाकार्याची संधी आणि विभागीय शिबिरासाठी निवड. युवक - युवतींना काय मिळेल ? ● जीवन कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात करण्याची संधी● स्थानिक पातळीवर एकदिवसीय युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागी होण्याची संधी● दर रविवारी चालणार्या स्वाध्यायमधून शारीरिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक विकास ● महाविद्यालयीन स्थानी नेतृत्व करण्याची संधी● देशभक्ती, सेवा, साहस व बौद्धिक यावर आधारित उपक्रमात सहभागाची संधी ● विभाग पातळीवर होणार्या तीनदिवसीय युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागी होण्याची संधी● उपक्रमात सहभागी शिबिरार्थींना प्रमाणपत्र