सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये २ बाद २१९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी सनरायजर्स हैदराबादला शतकी सलामी दिली.
दुबई, दि. २७ ऑक्टोबर : आयपीएलच्या ४७व्या लीग मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला २२० धावांचे आव्हान दिले. टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा घेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये २ बाद २१९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी सनरायजर्स हैदराबादला शतकी सलामी दिली. या आव्हानाचा दिल्लीला पाठलाग करता आला नाही. त्यांचा ८८ धावांनी पराभव झाला असून हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. ‘बर्थडे बॉय’ डेव्हिड वॉर्नरने पॉवर-प्लेमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ३४ चेंडूत ६६ धावा करून माघारी परतला. वृद्धिमान साहाने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. पण शतकाने त्याला हुलकावणी दिली. त्याने ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. त्यानंतर मनिष पांडे आणि केन विल्यमसन जोडीने शेवटपर्यंत खिंड लढवली. मनिष पांडेने ३१ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. तर विल्यमसनने नाबाद ११ धावा केल्या. शिखर धवन ( ०) आणि मार्कस स्टॉयनिस ( ५) यांना अनुक्रमे संदीप शर्मा व शाहबाज नदीन यांनी माघारी पाठवले. अजिंक्य रहाणे आज चांगल्या फॉर्मात दिसत होता, शिमरोन हेटमारयसह दिल्लीला सावरेल असेही वाटले होते. पण, राशिद खानच्या एका षटकात दोघेही माघारी परतले. राशिदनं दिल्लीला आणखी एक धक्का दिला. त्यानं ४ षटकांत ७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.