बालेकिल्ल्यात पत्नीचा पराभव झाल्यानं अजित पवारांवर मोठी नामुष्की ओढावली.
मुंबई, दि. १३ : मुंबई: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात दीड लाख मतांनी पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेवर संधी दिली आहे. लोकसभेतील पराभवाला १० दिवस उलटत नाहीत तोच राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यांनी विधिमंडळात जाऊन राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला.या जागेसाठी छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा होती. आज याबाबत बैठक घेऊन सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, “मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि इतर मंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत विचाराअंती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे हा सर्वानुमते निर्णय झाला आहे. पक्षात सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करायच्या असतात.” लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघात पराभूत झाल्या. बालेकिल्ल्यात पत्नीचा पराभव झाल्यानं अजित पवारांवर मोठी नामुष्की ओढावली. अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव मावळमध्ये २ लाखांहून अधिक मतांनी शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून हरले होते.