वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले.
मुंबई, दि. २ : मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. अमिन पटेल यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले. शायना एनसी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत अरविंद सावंत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आणि निवडणुकांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण इथे इम्पोर्टेड माल चालत नाही. आमच्या येथे ओरिजनल माल चालतो', असे अरविंद सावंत म्हणाले. या वक्तव्यावर अरविंद सावंत यांनी माफी मागितली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माफी मागितली. 'मी आयुष्यात कधीही कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय कारणास्तव वाद निर्माण करण्यात आला, असे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महिलांना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी नेहमीच अग्रेसर आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आणि मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि जाहीर माफी मागतो.