प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे.
फडणवीस यांनी डागली तोफ; न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्षपुणे, दि. १४ मार्च : ‘हे संपूर्ण प्रकरणत अत्यंत गंभीर आहे. पोलिसांतील लोकच असे काम करत असतील, अशा गंभीर गुन्ह्यात त्यांचाच सहभाग असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला. वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेकडून त्यांना पुन्हा कर्तव्यावर रुजू करुन घेण्याचा आग्रह होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर निशाणा साधला. एनआयएने केलेल्या कारवाईत अनेक पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणाचा अद्याप एकच भाग समोर आला आहे. यातील दुसरा भाग महत्वाचा आहे. मनसुख हिरे हत्या प्रकरण गंभीर आहे. त्या हत्या प्रकरणाचा तपशील बाकी आहे. याबाबतही लवकरच कारवाई होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांच्या वाझे यांना सेवेत करून घेण्याच्या आग्रहाबाबत आपण अॅडव्होकेट जनरल यांच्याची चर्चा केली; पण त्यांना पुन्हा कामावर घेणे योग्य नव्हते. आता कोरोनाचे कारण देत ठाकरे यांनी त्यांना फक्त कामावरच घेतले नाही, तर क्राईम ब्रँचमध्ये घेतले. मुंबईतील प्रत्येक केस त्यांच्याकडे जाईल अशी व्यवस्थाही केली. मग सरकारने दाखवलेला या विश्वासाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, असे वाझे यांना वाटत होते. वाझे यांच्यावर सरकारचा एवढा विश्वास का होता? त्यातूनच त्यांना गंभीर गुन्हे करण्याचे बळ मिळाले, अशी टीका फडणवीस यांनी केली.