यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक चॉकलेट दिले.
मुंबई, दि. २७ : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लिफ्टमधील भेट चर्चेत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक चॉकलेट दिले. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हेदेखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला. दादा लोकसभा निवडणुकीत आमचे ३१ खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल १ जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.