या सर्वा पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.
मुंबई, दि. २ : महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप निश्चित झालं आहे. यासह सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ४ नोव्हेंबरला उमदेवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने हा मतदारसंघ हायवोल्टेज ठरतोय. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून सदा सरवणकर येथून उभे आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घेऊन अमित ठाकरे यांना समर्थन द्यावं, असं महायुतीकडून सूचित करण्यात आलं होतं. परंतु, गेले १५ वर्षे आमदार राहिलेल्या सदा सरवणकर यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. काहीही झालं तरी मी ही निवडणूक लढवणारच, असा चंग त्यांनी बांधलाय. या सर्वा पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज ठाकरे लोकसभेत आमच्याबरोबर होते. त्यांच्याबरोबर माझी चर्चाही झाली होती. त्यांची काय रणनीती आहे हे मी त्यांना विचारलं होतं. त्यावर ते म्हणाले होते की शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) होऊद्या. मग ठरवू. पण त्यांनी थेट उमेदवारच जाहीर केला. आता (माहीम विधानसभा मतदारसंघातून) आमचेही आमदार आहेत. ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशीही मी चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते फार आक्रमक असून ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं नाही पाहिजे, हेही नेत्याचं काम असतं. त्यामुळे आजच्या तारखेला आमची शिवेसना (एकनाथ शिंदे), भाजपा आणि एनसीपी (अजित पवार) यांची महायुती आहे. याच महायुतीत आम्ही निवडणूक लढवत आहोत. तसंच, आरपीआय, जनसुराज्य असे लहान पक्ष सोबतीला असून आम्ही बहुमत मिळवू”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.