कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, की वाझे प्रकरणाची मुळे लांबपर्यंत गेली असून सरकार तुमचे असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कसे काय करत आहेत.
चंद्रकांतदादांचा दावा; नितीन राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारमुंबई, कोल्हापूर, दि. १६ मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची अटक या कारणांमुळे सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. राज्य सरकारमधील आणखी दोन मंत्री राजीनामा देणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेताच खासगी कामासाठी विमान वापरल्याचा गुन्हा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, की वाझे प्रकरणाची मुळे लांबपर्यंत गेली असून सरकार तुमचे असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कसे काय करत आहेत. मराठा आरक्षणावरूनही त्यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाचा अवमान करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पाटील यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालांवर दररोज टीका करणारे असे राज्यकर्ते पाहिले नसल्याचा पलटवार केला आहे. पवार यांनी इतिहासात असे राज्यपाल पाहिले नाही असे वक्तव्य केले होते, त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर वाझे यांना झालेल्या अटकेमुळे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आलेले असताना आता राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊतही अडचणीत आलेले आहेत. भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी राऊत यांच्या विरोधात आता मुंबईतील निर्मलनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राऊत यांनी बेकायदेशीरपणे राज्य सरकारचे चार्टर्ड विमान वापरले, असा आरोप पाठक यांनी केला आहे. इतकेच नाही तर हे विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची रितसर परवानगी लागत असते; मात्र अशी कोणतीही परवानगी राऊत यांनी घेतली नसल्याचाही आरोप पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीकडे केला आहे. मागील वर्षी ऐन कोरोनाच्या काळात राज्यापुढे आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना जुलै महिन्यात राऊत यांनी दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई असा चार्टर्ड विमानाने प्रवास केला आणि या हा सगळा प्रवास खासगी होता, यात सरकारी कामाचा कोणताही सहभाग नव्हता असाही आरोप पाठक यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. इतकेच नाही तर राऊत यांनी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकत ही बिले भरायला लावलीत, असा आरोपही पाठक यांनी आपल्या तक्ररीत केला आहे. या सगळ्या प्रकरणात मुळात मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला बगल देत राऊत यांनी परस्पर विमानाचा वापर केला आहे तसेच बेकायदेशीरपणे सरकारी कंपन्यांना आपली बिले राहायला लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आयपीसी 406, 409 कलमांच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पाठक यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तर या प्रकरणी राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाठक यांनी केली आहे. तसे न झाल्यास आपण मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई सुरूच ठेवू, असा इशारा पाठक यांनी दिला आहे. एकीकडे वीज बिले न भरल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज कापली जात आहे; पण सरकारी पैशांचा अपव्यय करणार्या मंत्र्यांवर कारवाई होणार का, असा सवाल पाठक यांनी विचारला आहे.