२१ वर्षीय अल्काराझने अंतिम सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रम कायम ठेवत आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकले.
लंडन, दि. १४ : स्पेनचा युवा टेनिसस्टार कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्या वर्षी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. २१ वर्षीय अल्काराझने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ७ वेळचा चॅम्पियन सर्बियाच्या अनुभवी नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ (७-४) असा सरळ सेटमध्ये पराभव करून चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीची पुनरावृत्ती करत अल्काराझने पुन्हा एकदा अंतिम फेरीत जोकोविचचा पराभव केला आणि त्याला ८व्यांदा विम्बल्डन जिंकण्यापासून रोखले. अलकाराझने यंदा सलग दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. गेल्या महिन्यातच त्याने प्रथमच फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले.२१ वर्षीय अल्काराझने अंतिम सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रम कायम ठेवत आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकले. अल्काराझने २०२२ मध्ये यूएस ओपनच्या रूपाने त्याच्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले होते. फ्रेंच ओपन आणि Wimbledon सलग जिंकणारा अल्काराझ आता सहावा खेळाडू ठरला आहे. एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा आणि गवत, माती आणि हार्ड कोर्टवर विजेतेपद पटकावणारा अल्काराझ, वयाची २२ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी दोन विम्बल्डन विजेतेपद पटकावणारा बोरिस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे २४वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न कार्लोस अल्काराझमुळे अपुरे राहिले. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या या महान खेळाडूला २१ वर्षीय तरुणाने जिंकण्याची संधी दिली नाही.