IMG-LOGO
महाराष्ट्र

उबाठानेही सुरु केली पाकिस्तानची हुजरेगिरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

Wednesday, May 15
IMG

कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ठाणे, दि. १५ : महाराष्ट्रात निवडणुकीचा पाचवा टप्पा उरला आहे. तर देशात एकूण तीन टप्पे बाकी आहेत. मात्र प्रचासभांचा धडाका सुरु आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पराभवाच्या भितीने इंडिया आघाडी बिथरलेली आहे. त्यांच्या नादी लागून उबाठानेही पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा याला उबाठाने प्रचारात उतरवले. त्यांच्या प्रचार मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकले जातात. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला. माझे मत काँग्रेसला देणार असे उबाठा अभिमानाने सांगत आहेत. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील याचा विचारही करवत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. २०१४ पूर्वी देशाचे पंतप्रधान एकदाही कल्याणमध्ये आले नाहीत. मात्र २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा कल्याणमध्ये आले. नरेंद्र मोदी यांच्या पदस्पर्शामुळे भिवंडी, कल्याण आणि ठाणे या जागा महायुतीने जिंकल्यात जमा आहे, असे वातावरण तयार झाले आहे. मोदी यांच्या आशिर्वादाने कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Share: