प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची चार तासांहून अधिक काळ ईडीकडून चौकशी झाली. पूर्वेश सरनाईक आज नोटीस देऊनही ईडीसमोर हजर झालेले नाहीत.
विहंग सोसायटी घोटाळ्याची सोमय्यांकडून ईडीकडे तक्रारमुंबई, दि. २३ डिसेंबर : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग सोसायटी घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली आहे. सरनाईक यांच्या नावावर 112 साताबारे असल्याची माहिती त्यांनी ईडीला दिल्याने सरनाईक यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांची चार तासांहून अधिक काळ ईडीकडून चौकशी झाली. पूर्वेश सरनाईक आज नोटीस देऊनही ईडीसमोर हजर झालेले नाहीत. पूर्वेश यांना आतापर्यंत दोन समन्स बजावण्यात आलेले आहेत, तर विहंग यांची दुस-यांदा ईडीची चौकशी सुरू असतानाच सोमय्या आज अचानक ईडी कार्यालयात पोहोचले. सोमय्या यांनी ईडी कार्यालयात जाऊन विहंग हौसिंग सोसायटीच्या घोटाळ्याची माहिती ईडीला दिली. सरनाईक यांनी या सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करतानाच सरनाईक यांच्याकडे 112 सातबारे असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सरनाईक यांनी 250 कोटी रुपये ढापले आहेत. त्यांनी कंपनीचे नावही बदलले आहे. सरनाईक यांनी ज्यांच्या संपत्ती जप्त केल्या, त्यांची नावे सात बा-यावर नसल्याचा दावा करतानाच सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी 16 डिसेंबरला ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी आधीच सांगितले होते. त्यानुसार दोन दिवसात त्यांनी तक्रार दाखल केली.सरनाईकांनी आरोप फेटाळलेविहंग गार्डन्स ही इमारत अनधिकृत नाही. ती इमारत संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उभारण्यात आली आहे. त्यामुळे माझी बदनामी केल्याप्रकरणी सोमय्या यांच्याविरोधात मी न्यायालयात शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे सरनाईक म्हणाले. त्यांनी सोमय्या यांचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असल्याचे म्हणत सर्व आरोप फेटाळले आहेत.