प्रज्ञा सातव यांना आम्ही ३० मतं द्यायचं ठरवलं होतं. त्यातली २५ मतं त्यांना मिळाली.
मुंबई, दि.१६ : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार जिंकले असून मविआचे २ उमेदवार विजयी झाले. यात भाजपाचे सर्व ५ उमेदवार, अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार व एकनाथ शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांचा समावेश आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर व काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्या. तर शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. या निवडणुकीत कॉंग्रेसची सात मते फुटल्याने कॉंग्रेसला झटका बसला आहे. आता त्या ७ विधानसभा आमदारांवर पक्षाकडून कारवाई होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नागपूरमधील विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी यांनी दिली आहे.प्रज्ञा सातव यांना आम्ही ३० मतं द्यायचं ठरवलं होतं. त्यातली २५ मतं त्यांना मिळाली. याचा अर्थ त्यांना पाच मतं मिळाली नाहीत. त्याशिवाय आम्ही ७ मतं मिलींद नार्वेकरांना द्यायचं ठरवलं होतं. त्यापैकी दोन मतं फुटली. त्यामुळे एकूण काँग्रेसची ७ मतं फुटली आहेत हे बरोबर आहे, असं अभिजीत वंजारी म्हणाले. येत्या २ ते ४ दिवसांत या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. पक्षश्रेष्ठी या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत. पक्षादेशाचं उल्लंघन म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंच्या आदेशांचंच उल्लंघन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर इतरांना मतदान करणं यापेक्षा दुसरी बेईमानी असू शकत नाही. त्यामुळे राज्यातल्या सर्व काँग्रेस प्रेमींची हीच इच्छा आहे की त्या आमदारांची नावं जाहीर करण्यात यावी आणि त्या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी”, असंही अभिजीत वंजारी म्हणाले.