तालुक्यातील शिरवाडेवणी या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या मुळगावी आयोजित करण्यात आला होता.
पुणे, दि.१६ : 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' अंतर्गत स्थापित 'राष्ट्रीय सरपंच संसद' आणि 'महाराष्ट्र शासन - सामाजिक वनीकरण विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येत असलेला 'वृक्षारोपण महायज्ञ' हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्वाचा असून गावागावात सरपंचांनी हा कार्यक्रम यशस्वी करावा,असे आवाहन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. 'वृक्षारोपण महायज्ञ' उपक्रमांतर्गत वृक्षरोपे वितरित करण्याचा व प्रत्यक्ष लागवडीचा पहिला कार्यक्रम नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील शिरवाडेवणी या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या मुळगावी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सामाजिक वनीकरण - नाशिक विभागाचे प्रमुख वनसंरक्षक मा.श्री.गजेंद्रजी हिरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने 'वृक्षारोपण महायज्ञ' उपक्रमांतर्गत 'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे सदस्य असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या 34 ग्रामीण जिल्ह्याच्या 351 तालुक्यातील 3400 ग्रामपंचायत गावात 34 लक्ष वृक्षरोपांची लोकसहभागातून लागवड करण्यात येणार आहे.'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' चे प्रणेते श्री.राहुल कराड यांची ही संकल्पना असून ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे वनमंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार हे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत.शिरवाडे वणी येथील कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील 'राष्ट्रीय सरपंच संसदे' चे सदस्य असणाऱ्या 120 ग्रामपंचायतींच्या विद्यमान सरपंचांना प्रत्येकी 40 प्रकारच्या वृक्षजातींचे 1 हजार वृक्षरोपे देण्यात येत असल्याचे पत्र प्रमुख अतिथिंच्या हस्ते देण्यात आले.यावेळी सामाजिक वनीकरण विभाग - नाशिक जिल्हा वनाधिकारी श्री.गणेश रणदिवे, निफाडचे तहसीलदार श्री.विशाल नाईकवाडे व निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. महेश पाटील तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्याचे 15 तालुका वनाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.प्रमुख संयोजक 'राष्ट्रीय सरपंच संसदे' चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील, सहसमन्वयक श्री.प्रकाशराव महाले,कार्यक्रम संयोजक शिरवाडे वणी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.शरदराव काळे व ग्रामविकास अधिकारी श्री.लिंगराजजी जंगम तसेच, सौ.रोहिणीताई नायडू, श्री. वाल्मिकराव सांगळे, सौ. ललिताताई बिरारी व श्री.रमेश थोरात व श्री.भास्करराव पवार उपस्थित होते.श्री. गजेंद्र हिरे यांनी 'वृक्षारोपण महायज्ञ' यशस्वी होण्यासाठी 'वन विभाग' सरपंचांना पूर्ण सहकार्य करील अशी ग्वाही दिली.श्री.गणेश रणदिवे यांनी उपक्रमाच्या आयोजनामागील वनीकरण विभागाची भूमिका स्पष्ट केली. श्री.योगेश पाटील यांनी उपक्रमाच्या कार्यवाहीची प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली.श्री.प्रकाशराव महाले यांनी प्रास्ताविक केले. सौ.रोहिणीताई नायडू यांनी सरपंच संसदेच्यावतीने तर श्री.शरदराव काळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे प्रारंभी स्वागत केले. ग्रामविस्तार अधिकारी व वाकी बिटूर्ली ग्रामपंचायती च्या प्रशासक डॉ. सौ.ज्योतीताई शिंदे - केदारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री.लिंगराज जंगम यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली.सूत्रसंचालिका डॉ.सौ.ज्योतीताई शिंदे - केदारे, दिंडोरी तालुका वनाधिकारी श्री.डी.एम शेरमाळे व खतवड चे उपसरपंच श्री.सुखदेव खुर्दळ यांचा विशेष सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.प्रमुख अतिथी व कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या 120 सरपंचांच्या हस्ते शिरवाडेवणी येथील कवी कुसुमाग्रज स्मारकाच्या भव्य प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.शिरवाडेवणी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामस्थांचे या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सहकार्य लाभले आहे.'वृक्षारोपण महायज्ञ' उपक्रमाचा प्रारंभ कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या मुळगावापासून - शिरवाडेवणी - होत असल्याचे समाधान सर्वत्र व्यक्त होत आहे.