IMG-LOGO
महाराष्ट्र

पवारांच्या एका निर्णयाने विरोधकांचे मनसुबे उधळले

Tuesday, Mar 02
IMG

विधान भवन मुख्य प्रवेशद्वार आणि विधान भवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली.

वीजदरवाढीवरून आंदोलनाच्या तयारीतील हवाच गेली निघूनमुंबई, दि. २ मार्च :  विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधी पक्षाच्या आमदारांच्या गदरोळाने सुरू झाला. अगदी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते विधान भवनाच्या पाय-या आणि शेवटी दोन्ही सभागृह दणाणून सोडण्यासाठी विरोधी पक्षाने जोरदार तयारी केली होती. हातातले फलक ते कृषी पंप आणि वीजजोड तोडलेले वीज मीटर घेऊन विरोधी पक्षाचे आमदार तयारीनेच आले होते. अधिवेशनात वीजबील दरवाढीवर गदारोळ होणार हे चित्र एव्हाना स्पष्ट झाले होते; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे एक निर्णय जाहीर केला आणि सगळे चित्र पालटले. विधान भवन मुख्य प्रवेशद्वार आणि विधान भवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली. आता दोन्ही सभागृहात वीजबील दरवाढ आणि कट केलेले वीज मीटर यावरच आक्रमकपणे गोंधळ घालण्यासाठी सर्व भाजप आमदार सभागृहात आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वीज दरवाढ आणि तोडलेले वीज मीटर यावर सरकारवर हल्ला चढवायला सुरुवात केली. समोर सत्ताधारी बाकांवर बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांचे म्हणणे शांतपणे ऐकले. फडणवीस यांच्यासह सर्वांना ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर देतील असे वाटत होते; पण थेट उपमुख्यमंत्रीच उत्तर देण्यासाठी उभे राहीले आणि अवघ्या काही सेकंदातच त्यांनी विषधमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडणार नाही, असा निर्णय जाहीर केला. विरोधी पक्ष ज्या मुद्द्यावर सरकारला घेरणार होते...ज्यासाठी त्यांनी आठवडाभर आधीपासूनच जोरदार तयारी केली होती... त्या सर्व आरोपांची... आणि विरोधी पक्षांच्या तयारीची हवा अजित पवार यांच्या या निर्णयामुळे निघाली. त्यामुळे दिवसभर गदारोळ घालण्याच्या तयारीत आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना आता पुढे काय करायचे हा प्रश्न पडला. कारण सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्ष ज्या तयारीने आला होता त्याच मुद्द्यावर पवार यांनी ताबडतोब निर्णय घेतला होता. त्यामुळे विधान भवनात पवार यांच्या या खेळीची चर्चा चांगलीच रंगली होती. पवार हे आपल्या सडेतोड स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. आज विरोधकांनाही त्याचा चांगलाच अनुभव आल्याचे त्यांनी आधी निदर्शनासाठी आणलेल्या आणि काही वेळातच परत पाठवायला लागलेल्या फलकांवरून दिसून आले.

Share: