IMG-LOGO
महाराष्ट्र

बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयातही नामंजूर

Monday, Feb 01
IMG

बोठे याच्या जामीनअर्जावर खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली. या वेळी सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निर्णय देत बोठे याचा जामीन फेटाळला.

अहमदनगर, दि. १ फेब्रुवारी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा टकपूर्व जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे.बोठे याच्या जामीनअर्जावर खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली. या वेळी सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निर्णय देत बोठे याचा जामीन फेटाळला. जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहे. बोठेचा अटकपूर्व जामीनअर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. फरार बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलिस आहेत, तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बोठे पुणे जिल्ह्यातील मावळ तसेच भोर परिसरात फार्म हाऊसवर होता, अशी माहिती मिळाली होती. तो दररोज ठिकाणे बदलत असतो. आता तो उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभर बोठेला अटक करण्यात आल्याची चर्चा होती. समाज माध्यमांतून तशा बातम्याही फिरत होत्या; परंतु त्याला अटक झाली नसल्याचे नंतर समजले.

Share: