उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कामकाजावर संताप व्यक्त केला.
मुंबई, दि.२३ : बदलापुरातील दोन चिमुरडींवरील लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणाची दखल घेत सुमोटो दाखल केला आणि आज यावर सुनावणी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या पीडितेचे स्टेटमेंट अद्यापही दाखल करून घेतलं नसल्याचं ठाणे पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. शाळेविरोधात अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही त्याशिवाय दुसऱ्या पीडितेचं स्टेटमेंटही घेतलं नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कामकाजावर संताप व्यक्त केला. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यास कोणावर कारवाई करायला मागे-पुढे पाहणार नसल्याचं यावेळी कोर्टाने सांगितलं.