पहिल्या कसोटीपूर्वी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात शतक ठोकणारा हनुमा विहारी या डावात सपशेल फ्लॉप ठरला.
अॅडिलेड, दि. १७ डिसेंबर : ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज गोलंदाजांचा सामना करताना भारतीय संघाच्या सुरुवातीला पटापट विकेट्स पडल्या. एकवेळ भारतीय संघाने ३२ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळी करत ६८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर पुजारा डावाच्या १०० धावांत तंबूत परतला. यानंतर फलंदाजीला अजिंक्य रहाणे आला. त्याने विराटसोबत ८८ धावांची भागीदारी रचली आणि १८८ धावांपर्यंत संघाला मजल मारण्यात योगदान दिले. यादरम्यान विराट कोहली ७४ धावांवर धावबाद झाला.विराट पाठोपाठ रहाणेही ४२ धावा करत तंबूत परतला. पहिल्या कसोटीपूर्वी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात शतक ठोकणारा हनुमा विहारी या डावात सपशेल फ्लॉप ठरला. त्याला केवळ १६ धावा करता आल्या. सध्या भारतीय संघ पहिल्या दिवसाअखेर ६ विकेट्स गमावत २३३ धावांवर आहे. संघाकडून वृद्धिमान साहा (९) आणि आर अश्विन (१५) धावांवर नाबाद आहेत.