या कंपन्या गुट्टे यांच्या मालकीच्या आहेत. ते कंपनीचे संचालकही आहेत.
परभणी, दि. २४ डिसेंबर : सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 635 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती ईडीने दिली. गुट्टे यांची 255 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अॅण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या कंपन्या गुट्टे यांच्या मालकीच्या आहेत. ते कंपनीचे संचालकही आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पीक खरेदी करताना गुट्टे आणि त्यांच्या सहकार्यांनी शेतकर्यांची माहिती घेत एक डेटा बँक तयार केली. त्यानंतर गंगाखेड साखर कारखाना शेतकर्यांसाठी कृषी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने काही बँकांशी जोडला गेला. थोडक्यात बँकांसाठी ते एजंट झाले आणि शेतक-यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. गंगाखेड साखर कारखान्याने शेतक-यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतले. बँकांनी 2012-13 ते 2016-17 दरम्यान जवळपास 772 कोटींचे कर्ज मंजूर केले आणि 632 कोटींची वाटप केले. हे पैसे लाभार्थी शेतक-यांपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. गंगाखेड साखर कारखान्याने शेतक-यांकडून मिळालेल्या स्वाक्षरीचा फायदा घेत हे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकले. कंपनीने हे पैसे जमीन तसेच शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी वापरले. गुट्टे यांनी इतरांच्या मदतीने गरीब शेतकर्यांसाठी असणा-या कृषी कर्ज योजनेचा गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. या कर्ज योजनेअंतर्गत बँका ऊस उत्पादक शेतक-यांना पिकांसाठी महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ बियाणे, खते, ट्रॅक्टर, पंप आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसे देतात. या बँक घोटाळ्यावरुन ईडीने कारवाई केली असून 255 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये गंगाखेड साखर कारखान्यातील 247 कोटींचा साखर उत्पादन विभाग, आणि मशीनरीचा समावेश आहे. तीन कंपन्यांची पाच कोटींची जमीन आहे. 1.58 कोटींचा बँक बॅलेन्स तसेच 1.91 कोटींचे शेअर्स आहेत.